पुणे: ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट ( वय ७७) यांचे दीर्घ आजाराने पत्रकारनगर येथे राहत्या घरी गुरुवारी सकाळी निधन झाले. मराठी साहित्यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले. दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. त्यांच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. डॉ. अनिता आणि अनिल अवचट यांच्या व्यसनमुक्तीच्या क्षेत्रातील कार्याचा वसा यापुढे असाच पुढे सुरू राहील असे मुक्तांगणचे अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी यांनी शोकसंदेशात म्हटले आहे. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रांद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रवादी प्रमुख शरद पवार यांनी शोकाकुल अवचट कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत असे म्हणत ट्विट करून दिवंगत अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
पवार म्हणाले, ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, पत्रकार डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले. मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून त्यांनी केलेले भरीव कार्य तळागाळातील अनेकांसाठी नव्या आयुष्याची सुरुवात ठरले. शोकाकुल अवचट कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. दिवंगत अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली...!
अनिल अवचट यांचा जन्म २६ ऑगस्ट १९४४ रोजी पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे झाला. वडील ओतुर येथे वास्तव्य करीत असल्याने त्यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण ओतुरलाच झाले. आठ भावंडात ते सर्वात मोठे असल्याने त्यांनी डॉक्टर व्हावे ही वडिलांची तीव्र इच्छा होती. गावात राहून हे जमणं कठीण म्हणून वडिलांनी त्यांना पुण्याच्या मॉर्डन हायस्कूलमध्ये, बोर्डिंगमध्ये शिक्षणासाठी ठेवले.१९५९ मध्ये एस .एस.सी. झाल्यावर फर्ग्युसन कॉलेज (पुणे) मधून ते इंटर आणि पुण्याच्याच बी. जे. मेडिकल कॉलेजमधून एम्.बी.बी.एस. झाले. याच कॉलेजमधील त्यांची मैत्रीण सुनंदा हिचेसोबत त्यांचे लग्न झाले.