पुणे: तज्ज्ञ प्राध्यापकांच्या समितीद्वारे मेट्रोच्या कामाचे पुन्हा एकदा परीक्षण केले जाणार आहे. मेट्रोच्या स्ट्रक्चरल ऑडीटचे काम स्विकारण्यापासून ते प्राथमिक अहवाल सादर करण्यापर्यंतच्या प्रक्रियेतील त्रुटी शोधण्यात येतील असे सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. एन. सोनवणे यांनी सांगितले.
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या वतीने डॉ. ईश्वर सोनार यांनी त्रयस्थ परीक्षणाचे काम स्विकारून प्राथमिक अहवाल पुणे महामेट्राेला प्रशासनाला केल्याचे निदर्शनास आले आहे. या अहवालातील तांत्रिक बाबींसंदर्भात विविध माध्यमातून निरीक्षणे नोंदविण्यात आली आहे. त्याची विद्यापीठ प्रशासनाने तातडीने दखल घेत, या विषयातील अनुभवी व तज्ज्ञ प्राध्यापकांच्या समितीव्दारे परीक्षण करत विस्तृत अहवाल मेट्रोकडे सादर करण्यात येणार असल्याचे डाॅ. साेनवणे म्हणाले.
अध्यापन आणि संशाेधनासह समाजातील तंत्रज्ञान विषयक विकासकार्याचे व प्रकल्पांचे निरीक्षण आणि परीक्षणाचे काम सीओईपी मार्फत करण्यात येते. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेकविध प्रकल्प बारकाईने अभ्यासून त्यांच्यातील गुणात्मक वाढीसाठी येथील अध्यापक वर्गाचा अनुभव आणि त्याच्या विषयातील नैपुण्य याचा समाजाच्या भल्यासाठी उपयोग करून देणे ही संस्थेची नेहमीच प्राथमिकता राहिली आहे. त्याद्वारे विविध औद्योगिक यंत्रणा, संरक्षण क्षेत्र, शासकीय व अशासकीय प्रकल्प यांच्यासाठी भरीव योगदान देत आले असल्याची माहिती त्यांनी दिली.