पुणे : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे उद्घाटन महाराष्ट्रदिनी करू, अशी घोषणा केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी करताच कामाला वेग मिळाला आहे. आता जवळपास ८९ टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामही वेगाने पूर्ण केले जात आहे. सध्या या उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे काम १५ ते २० एप्रिल या कालावधीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या चौकातील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात येणार आहे.
या चौकातील नवा उड्डाणपूल आणि रस्त्यांचे उद्घाटन १ मे रोजी करण्याच्या पार्श्वभूमीवर येथील कामे वेळेवर आणि गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी एनडीए चौक परिसरात १५ मार्च रोजी भेट देऊन कामांची पाहणी केली होती. जुन्या पाडलेल्या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे. त्यासाठी १५ ते २० एप्रिल या काळात गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार असून, या मार्गाची माहिती नागरिकांनी करून देण्यात येणार आहे, अशी माहिती देशमुख यांनी बुधवारी (दि. ५) दिली.
दाेन दिवस वाहतूक दुसऱ्या रस्त्याने वळविणार
एनडीए चौक परिसरातील नवा उड्डाणपूल आणि तेथील रस्त्यांचा ‘एनएचएआय’कडून आढावा घेण्यात आला. त्यानुसार या चौकातील उड्डाणपूल आणि रस्त्यांची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. नव्या उड्डाणपुलासाठी आवश्यक खांब उभारणीचे काम पूर्ण झाले असून, १५ ते २० एप्रिलदरम्यान गर्डर टाकण्याचे काम होणार आहे. त्यासाठी वाहतूक दोन दिवस पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन ‘एनएचएआय’कडून करण्यात येत आहे. मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे कामही प्रगतिपथावर आहे. याशिवाय बावधन ते सातारा आणि वेदभवन ते मुळशी या सेवा रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, १० एप्रिलपासून हे रस्ते वाहनचालकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे ‘एनएचएआय’कडून सांगण्यात आले.
एनडीए चौक सुशोभीकरणाचा आराखडा तयार
एनडीए चौकातील काम अंतिम टप्प्यात आहे. सद्य:स्थितीत हे काम ९० टक्के पूर्ण झाले असून, मेपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एनडीए सर्कल सुशोभीकरणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यास ‘एनडीए’कडून सहमती मिळाली असल्याचे ‘एनएचएआय’चे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी सांगितले.