पुणे :कात्रज चौकातील उड्डाणपुलाच्या कामासाठी वाहतूक वळविण्यात आली; पण कात्रजला वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी झाली आहे. वाहतूक वळविण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे उड्डाणपुलाचे काम रखडले आहे. हे काम कधी पूर्ण करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.कात्रज चौकातील वाहतूक काेंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. या उड्डाणपुलाचे काम करण्यासाठी असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचे काम वेळेत झालेले नाही. या कामाची मुदत यंदाच्या फेब्रुवारीत संपली आहे. त्यानंतर या कामाला पुन्हा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.उड्डाणपुलाचे गर्डर टाकण्याचे काम कात्रजच्या मुख्य चौकात आले आहे. हे काम करण्यासाठी वाहतूक वळविणे गरजेचे असून, वाहतुकीला पर्यायी व्यवस्था नसल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. वाहतूक वळविण्याचा निर्णय घेतल्यानंतर कात्रजला वाहतुकीची अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक वळविण्यासाठी वाहतूक पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून विचार सुरू आहे. या उड्डाणपुलाचे काम एका महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्येही पूर्ण होणार नाही, असे दिसते.चौकातील जागेचे भूसंपादन कधी ?उड्डाणपुलाच्या कामासाठी चौकातील रखडलेल्या जागांचे भूसंपादन करणे गरजेचे आहे. कात्रजच्या मुख्य चौकातील बहुचर्चित गुगळे प्लॉटच्या ४० गुंठे जागेचा दीड वर्षापूर्वी निर्णय होऊनही जागा महापालिकेच्या ताब्यात आलेली नाही. त्यामुळे उड्डाणपुलाच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. चौकातील खांबांवर गर्डर टाकण्यासाठी ही जागा ताब्यात घेऊन वाहतूक वळविणे गरजेचे आहे. त्याशिवाय काम करणे कठीण आहे.
कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम ठप्प; नागरिकांचे हाल : वाहतूक वळविण्यात येते अडचण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 2:34 PM