पुणे : मालाची परस्पर विक्री करून ती रक्कम स्वतःच्या बँक खात्यावर पाठवून कामगारांनी कंपनीची ३१ लाख ८४ हजार ७६९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी माधव कल्याण जगताप, राहुल अनिल सुलाखे, धनश्री माधव जगताप, प्रशांत जयराम जगताप, पूजा जगताप, मीनाक्षी कदम आणि धर्मेंद्र सुतार (सर्व रा. पुणे) या सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. याप्रकरणी अशोक विठोबा वर्पे (४७, चैतन्यनगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना २०१८ ते २०२२ या दरम्यानच्या काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी हे सॉफ्टहार्ड ऑटोमेशन कंपनीत कमर्शिअल हेड आहेत. आरोपी माधव जगताप आणि इतर आरोपी हे सॉफ्टहार्ड ऑटोमेशन कंपनीत विविध पदावर आहेत. आरोपींनी संगनमत करून कंपनीचा माल होल्टास कंपनीला न विकता दुसऱ्या कंपन्यांना परस्पर विकला. या विक्रीतून जमा झालेले ३१ लाख ८४ हजार ७६९ रुपये हे कंपनीच्या खात्यावर न भरता स्वतःच्या बँक खात्यावर पाठवून कंपनीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक छबू भागचंद बेरड करत आहेत.