पुणे : सोशल मीडियावर रिल्स बनवून टाकण्याची सध्या सर्व तरुणामध्ये क्रेझ आहे. त्यातूनच भररस्त्यावर रिल्स बनवित असताना मोटारसायकलने शेजारुन जाणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला. तस्लिम फिरोज पठाण (वय ३१, रा. गोडगाव, बार्शी, सध्या उरळी देवाची) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. हा अपघात महंमदवाडी येथील कृष्णानगरमधील पालखी रोडवर ६ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडला.
याप्रकरणी पोलीस हवालदार जोतीबा शंकर कुरळे यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आयान आणि झाइद (दोघे रा. सय्यदनगर, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयान आणि झाइद हे मोटारसायकलवर स्टंट करीत रिल्स बनवित होते. यावेळी तस्लिम पठाण या दुचाकीवरुन घरी जात होत्या. पालखी रोडवरुन घरी जाण्यासाठी शॉटकट असल्याने तेथून जात होत्या. या रस्त्यावर फारशी रहदारी नसते. त्यामुळे तेथे आयान शेख हा मोटारसायकल चालवत स्टंट करत होता. झाइद हा व्हिडिओ काढत होता. त्याचवेळी आयान याने तस्लिम पठाण यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात पठाण या खाली पडून त्यांचा मृत्यु झाला.
हा प्रकार पाहून मदत करण्याऐवजी दोघे पळून गेले. पोलिसांनी केलेल्या तपासात रिल्सच्या नादातून महिलेला जीव गमवावा लागल्याचे निष्पन्न झाल्याने दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.