कात्रज : कात्रज येथील नानासाहेब पेशवे तलावात रविवारी सकाळी एका युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली. तलावाच्या मध्यभागी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यासाठी काही तरुण निघाले होते. त्यावेळी काहीजण बोटीने पुतळ्याजवळ पोहोचले. मात्र, ज्ञानेश्वर शिवाजी पांचाळ (वय २३, रा. कात्रज) हा तरुण पोहत गेला. काठावर पोहोचण्याआधीच पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला.
कात्रज अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ५ जवानांनी दोन तासानंतर पाण्यातून या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला. मित्राने तलावात पोहत जाऊ नकोस, असे सांगूनही पोहून पुतळ्यापर्यंत जाण्याचा हट्ट युवकाला महागात पडला, असे भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितले. भारती विद्यापीठ पोलिसांनी मृतदेह ससून रुग्णालयात दाखल केला. कात्रज तलावावर कोणताही सुरक्षारक्षक नसल्याने ही दुर्घटना घडली आहे. याला ठेकेदर जबाबदार आहे. चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम यांनी केली आहे.
''सकाळी तरुण कात्रज तलावात बुडाल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून तरुणाचा शोध घेतला. दोन तासानंतर तरुणाचा मृतदेह सापडला. कोणतीही खबरदारी घेतल्याशिवाय पाण्यात उतरू नये.- संजय रामटेके, केंद्रप्रमुख, कात्रज अग्निशमन दल.''