पुणे : शहरातील पाषाणसारख्या उच्चभ्रू भागात कन्सल्टन्सीच्या नावाखाली जादूटोणा करत लाखो रुपये उकळण्यात येत हाेते. या प्रकरणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते, चतु:श्रुंगी पोलिस आणि पीडित व्यक्तीने स्टिंग ऑपरेशन करून वृषाली ढोले-शिरसाठ या तरुण महिलेचा पर्दाफाश केला आहे.
स्पर्धा परीक्षेत यश मिळण्यासाठी त्याला गंडेदोरे बांधून राख खायला दिली. त्यानंतर पाय धुतलेले पाणी प्यायला दिले. तसेच स्वत:च्या अंगी अंतेंद्रीय शक्ती असल्याचे भासवून युवकाला मृत्यूची भीती घातली. असे करत संबंधित युवकाची सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक करून त्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी वृषाली संतोष ढोले (रा. बी ४०५, वंशज गार्डन, साई चौक, पाषाण), माया राहुल गजभिये (रा. विठ्ठलनगर, सुतारवाडीरोड, पाषाण) आणि सतीश चंद्रशेखर वर्मा (रा. ३०१, गणेश हॉस्टेल, पाटीलनगर, बावधन) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका २३ वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. हा प्रकार २०२१ ते १६ डिसेंबर दरम्यान (गाळा क्रं. १८, मुक्ता रेसिडेन्सी, सुतारवाडी, पाषाण) येथे घडला आहे.
नैराश्यग्रस्तांना त्यातून बाहेर पडण्यासाठी व यश मिळवण्यासाठी समुपदेशन केले जाईल अशी जाहिरात सोशल मीडियातून करत लोकांकडून लाखो रुपये उकळले जात असल्याचे पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्याला नैराश्य आले.
तरुणाने यासंबंधीची तक्रार अंनिसचे कार्यकर्ते विशाल विमल यांच्याकडे केली. प्रकरणाची शहानिशा करून चतु:श्रुंगी ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि. १६) पीडित युवक व साध्या वेशातील पोलिसांसोबत त्या महिलेच्या कार्यालयात उपचारासाठी गेले आणि प्रकरणाचा पर्दाफाश केला. पोलिस निरीक्षक जगन्नाथ जानकर, सहायक निरीक्षक संभाजी गुरव आणि उपनिरीक्षक विद्या पवार तपास करत आहेत.