पुणे : पावसामुळे तुटून खाली पडलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून रोहित संपत थोरात (वय २०) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सिंहगड रस्त्यावरील गणेशमळा येथे भंडारी हॉटेलसमोर मंगळवारी सकाळी घडली. रोहित हा भाजी विक्रीचा व्यवसाय करत होता. मंगळवारी सकाळी तो दूध घेण्यासाठी निघाला होता. घराजवळच काही अंतरावर असलेल्या भंडारी हॉटेल समोरील रस्त्यावर तुटून पडलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तेथील एका महिलेने याची माहिती पोलिसांना दिली.
याप्रकरणी महावितरणच्या पर्वती विभागाकडून करण्यात आलेल्या प्राथमिक तपासणीत उपरी लघुदाब वाहिनीची तीन फेजपैकी एक वीजतार तुटून पदपथावर लोंबकळत असल्याचे आढळून आले. ही वीजतार तुटल्याक्षणीच फ्यूज गेला व तारेतील विद्युत प्रवाह देखील तत्काळ बंद झाला. मात्र, वीजप्रवाह नसलेली ही तार कोणीतरी हटविण्याच्या किंवा ओढण्याच्या प्रयत्नात उर्वरित दोन फेजच्या तारांमधील वीज लोंबकळणाऱ्या तारेत प्रवाहीत झाली व त्याचा धक्का बसून हा प्राणांतिक अपघात झाला असावा, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
मृताच्या कुटुंबीयास मदत
या अपघातप्रकरणी महावितरणकडून राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक विभागाला कळविण्यात आले. संबंधित विद्युत निरीक्षकांनी अपघाताच्या ठिकाणाची पाहणी करून चौकशीला सुरुवात केली आहे. त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या चौकशी अहवालानुसार महावितरणकडून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच मृत व्यक्तीच्या कुटुंबीयास तातडीची २० हजार रुपयांची प्राथमिक आर्थिक मदत महावितरणकडून देण्यात येत आहे.