किरण शिंदे
पुणे: पुण्यातील कोथरूड परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका महाविद्यालयीन तरुणीने आपल्या सोबत राहणाऱ्या एका 23 वर्षे तरुणीचे अर्ध नग्न फोटो काढून ते मित्रांना पाठवले. डिसेंबर 2022 ते जून 2023 या कालावधीत हा प्रकार घडला. कोथरूड पोलिसांनी याप्रकरणी आता पीडित तरुणीच्या मैत्रिणीसह सहा जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. 23 वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी तरुणी पुण्यातील एका प्रसिद्ध महाविद्यालयात शिक्षण घेत होत्या. कोथरूड परिसरात फ्लॅट रेंटवर घेऊन त्या एकत्र राहत होत्या. दरम्यान त्या रहात असलेल्या फ्लॅटवर आरोपी तरुणीचे मित्र अधून मधून येत असत. आरोपीने या मित्रांची ओळख फिर्यादी तरुण सोबत करून दिली होती. तसेच त्यांच्यासोबत मैत्री करावी म्हणून ती फिर्यादी तरुणीच्या पाठीमागे तगादा लावत होती. मात्र फिर्यादी तरुणीने मैत्री करण्यास नकार दिला. यावरून त्या दोघीत वादही होत होते.
दरम्यान काही दिवसानंतर आरोपी तरुणीने फिर्यादीचे खाजगी अर्धनग्न फोटो काढले आणि ती तिच्या मित्रांपैकी कोणालातरी पाठवले. त्यानंतर वेगवेगळी फेक इंस्टाग्राम अकाउंट काढून त्यावरून फिर्यादी तरुणीचे हे अर्धनग्न फोटो वारंवार व्हायरल केले गेले. हे सर्व अर्धनग्न फोटो फिर्यादीच्या कुटुंबीय आणि मित्र परिवारामध्ये गेले. आणि त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीने कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोथरूड पोलिसांनी आरोपी तरुणीसह तिच्यातील मित्रांवर आणि दोन फेक अकाउंट धारकांवर गुन्हा दाखल केला आहे. कोथरूड पोलीस अधिक तपास करत आहेत.