केडगाव: दौंड तालुक्यातील देलवडी येथील ३० वर्षीय एका युवकाची लग्नाच्या बेड्या अडकवू असा खोटा बनाव करून दोन लाखांची फसवणूक करून विवाहित वधू फरार झाल्याची घटना घडली आहे. ती नांदणार नसून जाताना कुटुंबियांना दमदाटी करून गेली असल्याने घाबरलेल्या वरासह कुटुंबियांनी यवत पोलीस ठाण्यात धाव घेतली.
यवत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नाचा खोटा बनाव कट रचून चित्रा कैलास अंभोरे या नाशिक येथील फरार झालेल्या वधूने येथील युवकाला व त्याच्या कुटुंबीयांना फसवले आहे. दरम्यान त्यांच्या मध्ये नाशिक येथील श्री साई वैदिक विवाह संस्था येथे विवाह झाला. त्यावेळी सांडू यशवंत जाधव याने दोन लाख रुपये फसवणूक झालेल्या कुटुंबाकडून घेतले. विवाह झाल्यानंतर यांच्यात वादावादी झाली. दरम्यानच्या गुन्ह्यामध्ये मारुती सुझुकी ही गाडी वापरण्यात आली. गुन्हेगारांना अटक करण्याची प्रक्रिया यवत पोलीस ठाण्यात चालू असून लवकरच गुन्हेगारांना अटक केले जाईल अशी माहिती तपासी अंमलदार पोलीस निरीक्षक आकाश शेळके यांनी दिली.
फिर्यादीवरून यवत पोलिसांनी बाबु चव्हाण (रा.यवत ता. दौंड, सिंधु माळी (रा.कोरेगांवभिमा ता.शिक्रापुर, सांडु यशवंता जाधव (रा.मढ ता.जि.बुलढाणा), सतिष मधुकर जोशी (रा. अशोकनगर सातपुते नाशिक, चित्रा कैलास अंभोरे (रा. मनमाड रामलालनगर ता.नांदगांव जि. नाशिक), आशा नानासाहेब निकम (रा. जेलरोड नाशिक), ज्योती रविंद्र लोखंडे (रा.चाचडगांव ता. दिंडोरी जि. नाशिक, मेघा गोपाल सोळखी (रा. पंचवटी नाशिक), आकाश दिनेश कोटे (रा.देवळालीगांव फुलेनगर नाशिक या सर्वांविरूध्द यवत पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार नगरे व पोलीस निरीक्षक शेळके करीत आहेत.