पुणे : नाट्यकर्मी, निर्माता, दिग्दर्शक अशा तिन्ही भूमिका लीलया बजावणारे आणि दोन राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटविणारे विवेक वाघ (वय ५४) यांचे खासगी रुग्णालयात निधन झाले. पुण्यात ८० च्या दशकात गाजलेल्या जोशी-अभ्यंकर खून खटल्यावर आधारित 'जक्कल' या शोध माहितीपटासाठी २०२१ मध्ये त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने नाट्य-चित्रपटसृष्टी क्षेत्रात शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी, जावई असा परिवार आहे. वाघ यांनी अवयवदानाचा निर्णय घेतला होता.
दीर्घकाळापासून कला क्षेत्रात कार्यरत असलेल्या विवेक वाघ यांनी नाट्य -चित्रपट सृष्टी गाजवली. व्यावसायिक नाट्यनिर्मितीसह " चेकमेट या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते तसेच माझं भिरंभिरं, सिद्धांत अशा चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. 'शाळा' या मराठी चित्रपटाने 2011 मध्ये मराठीतील सर्वोत्कृष्ट वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट विभागात राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले. 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ' जक्कल' या शोधात्मक मराठी माहितीपटाला ‘द बेस्ट इन्व्हेस्टिगेटिव्ह फिल्म’ पुरस्कार मिळाला. प्रसिद्ध मराठी निर्माता आणि दिग्दर्शक विवेक वाघ यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट 40 वर्षांपूर्वी पुण्यात घडलेल्या एका सत्य-गुन्हेगारी घटनेवर आधारित आहे.विवेक वाघ यांचा हा दुसरा राष्ट्रीय पुरस्कार आहे. त्याशिवाय कोकणातील कातळशिल्पांवर आधारित ‘स्टोन अँड एज’ हा माहितीपट त्यांनी नुकताच केला. त्यांच्या निधनाने नाट्यकर्मींनी हळहळ व्यक्त केली.