पुणे : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या पुणे विभागाच्या वतीने आयोजित ६३व्या नाट्य महोत्सवात घोरपडीगाव येथील कामगार कल्याण मंडळाने बाजी मारली. नेपथ्य, अभिनय, सादरीकरण अशा सर्वच पातळ्यांवर सरस ठरल्याने परीक्षकांना ‘अंतरंग’ हे नाटक भावले.दि. २१ डिसेंबर ते ६ जानेवारी या कालावधीत राष्ट्र सेवा दलाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या नाट्य महोत्सवात पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली येथील १४ केंद्रांच्या नाट्यसंघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे उपाध्यक्ष शाहीर पासलकर, ज्येष्ठ रंगकर्मी श्रीनिवास भणगे, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे सदस्य शिवाजी खटकाळे, यशवंत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. या वेळी ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पानसे, भाई ताम्हाणे, राजेंद्र वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.या नाट्यस्पर्धेमध्ये सहकारनगर संघाने ‘प्रश्न कायद्याचा आहे’ या नाटकाने द्वितीय तर इचलकरंजीच्या ‘शेवंता जित्ती हाय’ या नाटकाने तृतीय क्रमांक पटकावला. सांगली संघाच्या ‘अडगळ’ आणि सातारा संघाच्या ‘एक तळ गाळात’ या नाटकांनी उत्तेजनार्थ बाळासाहेब कुलकर्णी, उद्धदव कानडे, अंजली कुलकर्णी यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. बाळासाहेब गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. महेंद्र तायडे यांनी प्रास्ताविक केले. संजय सुर्वे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
नाट्यस्पर्धेत भावले ‘अंतरंग’!
By admin | Published: January 09, 2016 1:42 AM