लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : एका वृत्तपत्राच्या कचेरीत घडणारे नाट्य...पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करताना मूल्य तडजोडीसाठी करावा लागणारा संघर्ष...कार्यालयात बहरलेली एक अधुरी प्रेमकहाणी...त्यातून पत्रकाराच्या मनावर दाटलेले नैराश्याचे मळभ...दोन प्रेमी जीवांची आगतिकता...एका अवचित क्षणी हितगुज करण्याची मिळालेली संधी...ही संपूर्ण नाट्यमयता अभिवाचनाच्या माध्यमातून जिवंत झाली...अन तरूणाई त्या नाट्यात नकळतपणे गुंतली.
निमित्त होते ‘थिएटर ऑन फेस्टिव्हल’चे. कार्यशाळा, नाटय सादरीकरण, मँजिक शो, लेखकांशी गप्पा अशी भरगच्च मेजवानी असणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक क्षितीज पटवर्धन यांच्या हस्ते झाले. एरंडवणे येथील ‘द बॉक्स’ येथे हा दोन दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाला स्वीच बाईक, कार साथी, बेल्ज केक, वैष्णवी भेळ यांचे प्रायोजकत्व लाभले असून ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे. महोत्सवाच्या उदघाटनाप्रसंगी स्वीच बाईकचे चिराग उपाध्याय, कार साथीचे सौरभ साठे, बेल्ज केकचे विवेक बिददनूर, वैष्णवी भेळचे विजय जाधव तसेच महोत्सवाचे संयोजक अभिनेते शिवराज वायचळ, विराजस कुलकर्णी आणि सूरज पारसनीस उपस्थित होते.
दिवंगत साहित्यिक ह.मो मराठे यांच्या कथेचे लेखक क्षितीज पटवर्धन यांनी ‘दोन स्पेशल’ या नाटकात रूपांतर केले आहे. रंगभूमीवर गाजलेल्या या नाटकाने अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली. या नाटकाच्या अभिवाचनाचा रंगतदार प्रयोग शनिवारी (दि. २६) तरूणाईसमोर रंगला. या अभिवाचनाने सर्वांनाच खिळवून ठेवले.
“वाचन करणं ही कला अत्यंत दुर्मिळ होत चालली आहे. या नाटकाचे लेखन खूप वर्षे सुरू होते. या नाटकाच्या निमित्ताने नवीन पद्धतीने प्रयोग करून पाहिला. तेव्हा २५ तरी प्रयोग होतील की नाही अशी शंका वाटली. पण या नाटकाचे सव्वादोनशेपेक्षा जास्त प्रयोग झाले,” असे क्षितीज पटवर्धन यांनी सांगितले.
चौकट
महोत्सवात आज
रविवारी (दि. २७) या महोत्सवात दुपारी साडेचार वाजता लेखिका रितिका श्रोत्री आणि कौमुदी वालोकर दिग्दर्शित ‘तहकूब’ नाटकाचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर क्षितीज दाते याचा ‘मँजिक शो’ सायंकाळी सहा वाजता तर अभिनेते आणि लेखक गिरीश कुलकर्णी यांच्या नाट्य गप्पांचा कार्यक्रम साडेसहा वाजता होईल. लेखक विराजस कुलकर्णी याच्या ‘मिकी’ या नाटकाने महोत्सवाचा समारोप होईल.