गतवर्षीचा कोरोना काळ कलविश्वाची परीक्षा घेणारा ठरला. आमच्या ‘ब्लाईंड गेम’ नाटकाचा शेवटचा प्रयोग 12 मार्च 2020 ला झाला आणि त्यानंतर लॉकडाऊन जाहीर झाले. पुण्या-मुंबईमधील शो रद्द करण्याची वेळ आली. आमचे सगळे पैसे वाया गेले. जवळपास 60 ते 70 हजार रुपयांचे नुकसान झाले. त्यानंतरच्या काळात तब्बल नऊ महिने कलाविश्व ठप्प होते. ज्यांचे हातावर पोट होते. त्या पड्यामागच्या कलाकारांचे खूप हाल झाले. लॉकडाऊन किती चालेल याची माहिती नसल्याामुळे आम्ही निर्मात्यांनी पुण्यातील 40 पडद्यामागच्या कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंची मदत केली. त्या काळात काही कलाकारांनी भाजीविक्री, कपड्यांना इस्त्री करून देणे, प्लंबिंग, दुरूस्ती यांसारखी कामे केली. त्यानंतर कोरोनाची परिस्थिती हळूहळू आटोक्यात आल्यानंतर शासनाने लॉकडाऊन शिथिल केले मात्र नाट्यगृह 50 टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली. बालगंधर्व रंगमंदिर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृह यांची 1000 ची क्षमता आहे याचा अर्थ 500 प्रेक्षकच येणार. यातच पहिल्या रांगा मिळाल्या नाही तर आम्हाला मागची रांग नको. आम्ही पुढच्या प्रयोगाला येऊ, असे प्रेक्षक म्हणत आहेत. एक मात्र आहे की महापालिकेने नाट्यगृहांचे भाडे वाढवले नाही. त्यामुळे काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला. पण आम्हाला 4 ते 5 हजार रूपयांचे नुकसान सहन करावे लागले. आता 14 फेब्रुवारीपासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले आहेत. त्याच्यानंतरचे तीन प्रयोग मी रद्द केले. कलाकार देखील काम करायला घाबरू लागले आहेत. कारण चेहऱ्याला मास्क लावून रंगमंचावर काम करता येत नाही. त्यामुळे आम्ही 20 फेब्रुवारीपासून प्रयोग थांबवले आहेत. शासनाने कलाकारांचा विचार करून ठोस निर्णय घ्यायला हवे आहेत.
----------------------------------------------------------------