पुणे : शहरातील महापालिकेच्या मालकीच्या चार नाट्यगृहांमध्ये नवी अग्निशमन यंत्रणा बसवण्यासाठी सव्वातीन कोटी रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मंगळवारी झालेल्या सभेत मान्यता दिली. ही यंत्रणा बसवण्याचे काम एकाच ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे.बालगंधर्व नाट्यगृह, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, सावरकर भवन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन या चार इमारतींमधील अग्निरोधक यंत्रणा नादुरुस्त झाली होती. चारही ठिकाणी कार्यक्रमांसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन तिथे त्वरित अशी यंत्रणा उभारणे गरजेचे होते, त्यामुळे प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवली होती. त्याप्रमाणे आलेल्या निविदांमध्ये एकाच ठेकेदार कंपनीच्या चारही नाट्यगृहांसाठीची निविदा प्राप्त ठरली.त्यानुसार आता बालगंधर्व नाट्यगृहासाठी ९६ लाख ३ हजार रुपये, सावरकर भवनसाठी ७१ लाख १३ हजार, कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासाठी ७६ लाख २४ हजार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम ७२ लाख २६ हजारामध्ये करून घेण्यात येणार आहे.या चारही कामांच्या एकूण सव्वातीन कोटींच्या निविदा एच.डी. फायरकॉन टेक्नो या ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. त्यांना त्वरित काम सुरू करण्याचे आदेश द्यावेत असे समितीने प्रशासनाला सांगितले आहे. दिलेल्या मुदतीतच हे काम करावे याकडे लक्ष द्यावे अशी सूचनाही समितीने केली आहे.ज्या विभागाचे काम त्याच विभागाने निविदा प्रक्रियाराबवण्याचा संकेत असताना ही निविदा प्रक्रिया भवन विभागाने राबवली आहे. त्यामुळे त्याची चर्चा महापालिका वर्तुळात होती. त्यातच एकाच ठेकेदार कंपनीला चारही कामे दिली गेल्यानेही शंका उपस्थित केल्या जात आहेत. समितीच्या काही सदस्यांनी त्याबाबत विचारणा केली. मात्र, निविदा प्रक्रिया योग्यप्रकारे राबवून ठेकेदाराची निवड करण्यात आली असल्याचेप्रशासनाने स्थायी समितीच्या बैठकीत सांगितले. त्यानंतर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
नाट्यगृह होणार आगप्रतिबंधक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 3:39 AM