पुणे : पुण्यात सर्व व्यवहार सुरळीत सुरु झाले आहेत. त्यानंतर आता सर्व मंदिर आणि सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांना परवानगी देण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर येत्या २२ ऑक्टोबरपासून नाट्यगृह आणि सिनेमागृह ५० टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात येत आहे. दसरा झाला कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत याबाबत बैठक होईल. तर येत्या साेमवार (दि. ११) पासून जिल्ह्यातील हॉटेलांना आणखी एक तासाची वेळ वाढवण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे आता रात्री ११ वाजेपर्यंत हॉटेल सुरू ठेवता येणार आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
विधानभवन येथे कोरोना आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी हॉटेलबाबत महत्त्वाची घोषणा केली. त्याचबरोबर सिनेमागृह (मल्टिप्लेक्स) आणि नाट्यगृह सुरु करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे, असे देखील सांगितले.
पवार म्हणाले, जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरातील पर्यटन स्थळे पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दीड वर्षांनंतर राज्यातील मंदिरे सुरू झाली आहेत. अनेक ठिकाणी गर्दी न करता सर्व नियम पाळून मंदिरात जा, असा सल्लाही अजित पवार यांनी यावेळी दिला.
झोपडपट्टीमध्ये लसीकरण वाढवणार
देशात लसीकरणामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्रात पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. पुणे जिल्ह्यात झोपडपट्ट्ट्यांचे प्रमाण जास्त आहे. आपण ७५ तास लसीकरण कार्यक्रम राबवला आहे. आता यापुढे झोपडपट्टीमध्ये घरोघरी जाऊन लस देण्याचे मोहीम हाती घेणार आहे, असे देखील अजित पवार यावेळी म्हणले.