पिंपरी : दुचाकीस्वाराला अडवून कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच १८ लाख रुपयांची बॅग घेऊन चोरटे पळून गेले. सांगवी फाटा येथे दि. २८ सप्टेंबर २०१९ रोजी हा प्रकार घडला. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १०) दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी दुधाराम भैराराम देवासी (वय २७, रा. मारुंजी, ता. मुळशी, मूळ रा. भैसाना, ता. सोजत, जि. पाली, राजस्थान) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार पाच आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी दुधाराम व त्यांचा साथीदार सोहनलाल देवासी शेसाराम देवासी यांच्याकडे नोकरीस आहेत. शेसाराम देवसाी बिस्किट आदी विविध वस्तूंची होलसेल विक्री करतात. त्यांच्याकडे लालाराम देवासी दिवानजी म्हणून नोकरीस आहेत.व्यवसायातील व्यवहारातून शेसाराम देवासी यांच्या घरी जमा झालेले १८ लाख रुपये दिवानजी लालाराम यांनी फिर्यादी दुधाराम यांना दिले. एका बॅगेत १८ लाख घेऊन फिर्यादी दुधाराम व त्यांचा साथीदार सोहनलाल देवासी एका दुचाकीवरून पुण्यातील मार्केटयार्ड येथे जात होते. त्यावेळी सांगवी फाटा येथे दोन दुचाकीवरून पाच आरोपी आले. यातील एका दुचाकीवर तीन आरोपी होते. सांगवी फाटा येथे आरोपींनी फिर्यादी दुधाराम यांची दुचाकी अडवून गाडी आडवी लावून कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच फिर्यादी दुधाराम यांच्याकडील १८ लाख रुपये असलेली बॅग व दुचाकीची चावी जबरदस्तीने काढून घेऊन पुण्याचेय दिशेने पळून गेले.दरोड्याचा हा प्रकार २८ सप्टेंबर रोजी घडला. त्यावेळी मालक शेसाराम देवासी राजस्थान येथे होते. घडलेल्या प्रकाराबाबत मालक शेसाराम यांना माहिती देण्यात आली. ते राजस्थान येथून परतल्यानंतर त्यांनी याप्रकाराबाबत अधिक माहिती घेतली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली. त्यानुसार गुरुवारी (दि. १०) गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मोहन शिंदे तपास करीत आहेत.
कोयत्याचा धाक दाखवून दुचाकीस्वाराला मारहाण करत लांबविले १८ लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2019 4:55 PM
दुचाकीस्वाराला अडवून कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली.
ठळक मुद्देदरोड्याचा गुन्हा दाखल : सांगवी फाटा येथे घडला प्रकार