पुणे : मागील दोन महिन्यात लॉकडाऊन असल्याने लोकांचे बाहेर फिरणे कमी झाले होते. गेल्या १५ दिवसात अनलॉक होऊन निर्बंध शिथिल होताच शहरातील वाहन चोरींच्या गुन्ह्यात पुन्हा वाढ होऊ लागली आहे. सोमवारी एकाच दिवसात शहरात ५ दुचाकी आणि एक चारचाकी वाहने चोरीला गेलेल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या ६ दिवसात ३७ वाहने चोरीला गेली आहेत. जून महिन्यात आतापर्यंत सरासरी दररोज ४ वाहने चोरीला जात आहेत.
गेल्या वर्षी जून २० अखेर शहरातून ३४२ वाहने चोरीला गेली होती. त्याच्या तुलनेत आतापर्यंत ६११ वाहने चोरीला गेली आहेत. मे २०२१ अखेर शहरातून ५३० वाहने चोरीला गेली होती. गेल्या २१ दिवसात तब्बल ८१ वाहने चोरीला गेली आहेत.
गेल्या वर्षातील अनेक महिने कडक लॉकडाऊन होता. रस्ते निमनुष्य होते. असे असतानाही वर्षभरात ९७५ वाहने चोरीला गेली होती. त्यामध्ये ८७० दुचाकी, ७७ चारचाकी आणि २८ तीन चाकी वाहनांचा समावेश होता. त्यापैकी पोलिसांनी ३३० वाहने जप्त केली होती.पोलीस आयुक्त के. वेंकटेशन यांनी वाहनचोरी पथकासह काही पथके रद्द केली होती. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कार्यभार घेतल्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेची पूर्नरचना करता दरोडा व वाहनचोरी पथकाचे दोन युनिट पुन्हा सुरु केली आहेत. असे असतानाही शहरातील वाहन चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.