शेलपिंपळगाव : शेलपिंपळगाव (ता.खेड) येथे रात्रीच्या सुमारास एका पोलीस शिपायाच्या घराच्या दाराचे कुलूप तोडून अज्ञात पाच ते सहा चोरट्यांनी कपाटातून ६२ हजार ५०० रुपये किंमतीचे सोने लंपास केले. दरम्यान चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असलेल्या पोलीस शिपायावर संबंधित चोरट्यांनी धारदार कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस शिपाई गंभीर जखमी झाले असून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदरची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून पाच ते सहा चोरटे दिसून येत आहेत. याप्रकरणी अनिकेत पंडित दौंडकर (रा. शेलपिंपळगाव ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी (दि. १३) रात्री अडीचच्या सुमारास शेलपिंपळगाव हद्दीतील अभ्यासिकेजवळ असलेल्या अनिकेत पंडित दौंडकर यांच्या घरात घडली. चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातून २० ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे मंगळसूत्र व पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी चोरून नेली. दरम्यान फिर्यादी अनिकेत दौंडकर व त्यांच्या तीन - चार मित्रांनी चोरांचा पाठलाग करून पकडण्याचा प्रयत्न केला असता एकाने अनिकेत दौंडकर यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये दौंडकर गंभीर जखमी झाले. संबंधित चोरटे अंदाजे २५ ते ३० वर्षीय असून त्यामध्ये एका महिलेचाही समावेश असल्याचे फिर्यादी यांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस तपास करत आहेत.