येथील नानासाहेब गावशेते, प्रभाकर दाभाडे, फकीरा ढोमे, विठ्ठल देवराम दाभाडे, दामू दाभाडे, बाबाजी दाभाडे, श्रीराम गावशेते, दत्तात्रेय टेमकर, राजाराम दाभाडे, मारुती बोंबे, नानाभाऊ बोंबे, मधुकर दाभाडे, जितेंद्र बराटे, रामदास ढोमे, सुमन बोंबे, गणेश बराटे, राजाराम चव्हाण, दौलत ढोमे यांच्या सुमारे ५ लाख रुपयांच्या केबलची चोरी झाल्याचे देवराम बोंबे यांनी सांगितले. शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असतानाच खरिपाच्या हंगामात शेतीपंपाच्या केबलची चोरी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठा आर्थिक बोजा पडणार आहे. यापूर्वीही घोड व कुकडी नदीकिनारी असलेल्या विद्युत मोटारींच्या केबलची अनेकवेळा चोरी झाल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. पोलीस ठाण्यात याबाबत अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. टाकळी हाजी येथेही सहा महिन्यांपूर्वी अशाचप्रकारे केबल चोरीची घटना घडली होती. मात्र, चोरांचा तपास लागत नसून, या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी चोरीला जात आहेत. मात्र, मोटार चोरीला गेल्यानंतर पोलीस शेतकऱ्यांकडे विद्युत मोटार खरेदीचे बिल मागतात. शेतकऱ्यांनी मोटार दहा-वीस वर्षांपूर्वी घेतलेली असल्यामुळे त्यांच्याकडे बिले सापडत नाहीत, त्यामुळे अनेकवेळा गुन्हादेखील नोंदवून घेतला जात नाही. एकीकडे पोलिसांकडून तपास होत नाही, चोरीचे सत्र मात्र सुरूच आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे. रांजणगाव गणपती पोलिसांनी नुकतेच काही मोटार चोरांना पकडले असून, शिरूर पोलिसांनीही अशी धडक कारवाई करण्याची मागणी घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजेंद्र गावडे यांनी केली आहे.
पिंपरखेड येथे घोड नदीवरील १९ मोटारींच्या केबलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 4:11 AM