पुणे: पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीसोबतच महात्मा फुले मंडई येथील शारदा गजानन बाप्पा देखील पुणेकरांच्या मनातील श्रद्धास्थान आहे. पण याच मंदिरात बाप्पांचे दागिने चोरीला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मा फुले मंडई येथे असणाऱ्या शारदा गजानन हे मंडळ पुण्यातील प्रसिद्ध मंडळांमध्ये गणले जाते. या मंदिरातीलचोरीची ही दुसरी घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या वेळी बाप्पांच्या मूर्तीवरील जवळपास 22 ते 25 तोळे सोने व काही रोख रक्कम लंपास केली आहे. चोरीची घटना शुक्रवारी पहाटे निदर्शनास आली. चोरीच्या घटनेची माहिती विश्रांतवाडी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
याअगोदर तीन वर्षांपूर्वी मंदिरातील दानपेटी चोरीला गेली होती. त्यानंतर मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवतानाच सुरक्षा व्यवस्था देखील वाढविण्यात आली होती. मात्र तरीदेखील चोरट्यांनी मध्यरात्री डाव साधत बाप्पांच्या दागिने व रोख रकमेवर डल्ला मारला. या चोरीच्या घटनेनंतर मात्र एकच खळबळ उडाली आहे. दरवर्षी गणेश उत्सवातील देखावे व मिरवणुक आकर्षण व चर्चेचा विषय ठरत असते.