राजगुरुनगर: निमगाव खंडोबा (ता खेड ) येथे अज्ञात चोरट्यांनी घराची कौले काढून घरामध्ये प्रवेश करून सोने सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकोणसत्तर हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला.याबाबत द्वारका शंकर वायकर (वय५३, रा. निमगाव खंडोबा, ता. खेड) यांनी खेड पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की , बुधवारी (दि.११ ) दत्तजयंती उत्सवानिमित्त ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम गावात आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम घरासमोरच होता. कार्यक्रम पाहण्यासाठी रात्री ११ वाजता द्वारका वायकर व त्यांचे पती शंकर वायकर हे घराच्या पाठीमागील दरवाजाला आतून कडी लावून व समोरील दरवाजाला कुलूप लावून असे दोन्ही दरवाजे बंद करून ऑर्केस्ट्रा चा कार्यक्रम पाहण्यास गेले होते. दरम्यान, सकाळी लवकर शेतात कामाला जायचे असल्याने हे दोन्ही पती-पत्नी पावणेबाराच्या सुमारास पुन्हा घरी आले त्यांनी कुलूप उघडून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, दार उघडले नाही. दाराला आतमधून कडी लावली असल्याच्या त्यांच्या लक्षात आले. घराच्या मागील दरवाजाकडे त्यांनी जाऊन पाहिले असता मागील दरवाची बाहेरून कडी लावलेली होती. ती कडी उघडून घरात प्रवेश केला असतास दारासमोरच भिंतीलगत ठेवली धान्याच्या पोत्यामधील गहू व तांदूळ सांडलेले दिसले. तसेच हॉलमधील लोखंडी कपाट उघडे होते. अज्ञात चोरट्यांनी घराच्या पोटमाळ्यावरील घरांची ४ कौले काढून आर्केस्ट्रा कार्यक्रमाचा आवाजाचा फायदा घेऊन कौलावाटे घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले रोख रक्कम १४ हजार रुपये, व सोन्याचे दागिने, मोबाईल असा ६९ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. पुढील तपास पोलिस हवालदार एस. एन. घोडे करत आहे.