दौंड (पुणे) : दौंड रेल्वे स्थानकातून हवाई दलातील एका अधिकाऱ्याचे पिस्तूल, सहा जिवंत काडतुसे, आणि कागदपत्र चोरीला गेले आहेत. या घटनेमुळे दौंड शहरात एकच खळबळ उडाली आहे. दत्तराज पाटील ( वय २३, रा.वरवंड, ता. मेहकर, जिल्हा बुलढाणा) असे हवाई दलातील अधिकाऱ्याचे नाव आहे. सोमवार दि.२३ रोजी विंग कमांडर दत्तराज पाटील हे मध्यरात्री पावणेतीनला दौंड रेल्वे स्थानकात आले. दरम्यान फलाट क्रमांक तीनवर ते झोपी गेले असता बॅग चोरून नेली. या बागेत नऊ एमएम पिस्टल आणि खात्याची महत्त्वाची कागदपत्रे होते.
या संदर्भात दत्तराज पाटील यांनी दौंड रेल्वे पोलिस स्थानकात फिर्यादी असून त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती रेल्वे पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, एका महिला प्रवाशाचे एक लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्यातील नोंदीनुसार २२ जानेवारी २०२३ रोजी रूपा हनुमंतराव नलवडे (वय ४०,रा. बागलकोट,कर्नाटक) या सिकंदराबाद -राजकोट एक्स्प्रेस गाडीने पहाटेच्या वेळेस दौंड रेल्वे स्टेशनवर उतरल्या. त्यांना पुढे दिल्लीला जायचे होते व दिल्ली जाण्यासाठीची गाडी सकाळी १० वाजता होती. सदरची महिला प्रवासी त्या प्लॅटफॉर्म क्रमांक ५ वर थांबल्या. पहाटे साडेतीन वाजता त्यांच्याकडे असणाऱ्या दोन ट्रॉली बॅग व दोन बॉक्स यापैकी एक ट्रॉली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या बॅगेमध्ये वीस हजार रुपये. रोकड, सोन्याचे दागिने, मोबाइल असा एकंदरीत १ लाख ६१ हजार रुपयांचा ऐवज असल्याचे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे.
पिस्तूल गेल्याची साशंकता वाटते
संबंधित विंग कमांडर अधिकाऱ्याची चौकशी केली असता दत्तराज पाटील या नावाने भारतीय हवाई दलात कुठलाही अधिकारी नाही. तसेच त्यांनी दिलेल्या फिर्यादीबाबत साशंकता आहे तरीदेखील योग्य तपास सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गायकवाड यांनी सांगितले.