दौंड : दौंड शहरातील डिफेन्स कॉलनीमधील बंद घराचा दरवाजा तोडून कपाटातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे. याबाबत शाहीद शेख यांच्या फिर्यादीवरून दौंड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी यांचा रियल इस्टेट एजंट आहे. फिर्यादी डिफेन्स कॉलनीमध्ये, तर त्यांचे आई-वडील गजानन सोसायटी येथे राहत आहेत. फिर्यादी व त्यांचे कुटुंब शुक्रवारी (दि.१५) पुणे येथे कामानिमित्त गेलो होते. पुण्यावरून येण्यास उशीर झाल्याने फिर्यादी हे गजानन सोसायटी येथील वडिलांचे घरीच झोपले होते. शनिवारी (दि.१६) सकाळी फिर्यादी डिफेन्स कॉलनी येथील घरी गेल्यानंतर घराचे कुरूप तोडलेले दिसले. घरातील परिस्थिती पाहून घरात चोरी झाल्याचे फिर्यादी यांना दिसून आले.
फिर्यादी यांच्या घरातील गोदरेजचे कपाट उघडे दिसले व त्यातील कपडे व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. यावेळी कपाटाची पाहणी केली असता कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेली रोख रक्कम व सोने मिळून आले नाही. यानंतर फिर्यादी यांनी दौंड पोलिसांना घटनेची दिली. या घटनेत फिर्यादी यांचे रोख २ लाख १५ हजार रुपये आणि २ लाख २८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने असे एकूण ४ लाख ४३ हजार रुपयांची चोरी झाली आहे. दौंड पोलिस ठाण्यात रविवारी (दि.१६) अज्ञान चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.