पुणे : बँकेत भरणा करण्यासाठी निघालेल्या व्यावसायिकाला तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून चोरट्यांनी ७ लाख १५ हजारांची रोकड लुटल्याची घटना शुक्रवारी मुंढवा भागात घडली. याप्रकरणी मनोज केवरामानी (वय २९,रा. रहाटणी) यांनी मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीस्वार चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केवरामानी व्यावसायिक आहेत. त्यांचे हडपसर भागात कार्यालय आहे. कोरेगाव पार्क भागातील सेवा विकास बँकेत त्याचे खाते आहे. दररोज जमा झालेली रोकड केवरामानी बँकेत जमा करतात. केवरामानी आणि त्यांचा मित्र शैलेश रणपिसे दुचाकीवरून मुंढवा भागातून निघाले होते. त्यावेळी त्यांच्या मार्गावर असलेल्या दुचाकीस्वार चोरट्यांनी दुचाकीस्वार केवरामानी यांना अडवले. त्यांना कोयत्याचा धाक दाखविला. रणपिसे यांच्याकडे असलेल्या पिशवीतील ७ लाख १५ रोकड लुटून चोरटे फरार झाले. केवरामानी यांच्यावर पाळत ठेवून रोकड लुटल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांकडून या भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रीकरण तपासण्यात येत आहे. चित्रीकरणात चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवल्याचे उघडकीस आले आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी पुढील तपास करत आहे.
पुण्यात हत्याराचा धाक दाखवून सव्वासात लाख लुटले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 4:02 PM