पुणे : रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शनचा संपूर्ण डोस न देता त्यातील एक इंजेक्शन चोरून त्याची बाहेर काळ्याबाजारात विक्री करण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. आता ससून रुग्णालयातील कोविड इमारतीतून रुग्णांना देण्यासाठी आणण्यात आलेले रेमडेसिविर इंजेक्शन चोरीला गेले आहे.
याप्रकरणी ससून रुग्णालयातील परिचारिकांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना १ ते ३ मे दरम्यान घडली. फिर्यादी या ससून रुग्णालयातील कोविड इमारतीत कर्तव्यावर आहेत. त्यांनी १ मे रोजी रुग्णासाठी इंजेक्शन मागितले होते. ते सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मिळाले. दुसऱ्या दिवशी ते फिर्यादी यांना देण्यात आले. त्यांनी त्यातील एक इंजेक्शन रुग्णाला दिल्यानंतर उरलेले एक इंजेक्शन व रिकामी कुपी आणून ठेवले. त्यानंतर दुपारी ते सापडले नाही. सर्वत्र शोध घेतल्यानंतरही ते सापडले नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता अधिपारिचारिका यांनी फिर्यादी यांना येऊन सांगितले की, कुपी मिळाली असून त्यातील भरलेली कुपी दिसून आली नाही. त्यानंतर त्यांनी बंडगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.