लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती / सांगवी : बारामती एमआयडीसीमधील धागा बनविणाऱ्या एका कंपनीमधून चोरीस गेलेले इलेक्ट्रिक ड्राइव्ह इन्वहर्टरचे पाच संचाचा चोरीचा गुन्हा दाखल केला आणि बारामती तालुका पोलिसांनी धागेदोरे तपासात अवघ्या चोवीस तासांच्या आत गुन्हा उघडकीस आणून तब्बल ११ लाखांच्या मुद्देमालासह आरोपीला जेरबंद केले आहे. गुन्ह्यातील चोरी करणारे दोन्ही आरोपी परराज्यातील असून, एकाला ताब्यात घेतला असून एक जण फरार झाला आहे.
लालमोहन मौर्य (वय २२, रा. कुर्ला मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, तर मुकेश गौड (वय २७, रा. कुशीनगर, उत्तर प्रदेश) हा आरोपी फरार आहे. स्पेन्टेक्स सीएलसी प्रा. लि. या धागा बनविणाऱ्या कंपनीतून सीमेन्स कंपनीचे ८ लाख रुपये किमतीचे इलेक्ट्रिक ड्राइव्ह, ५ इन्व्हर्टर सीपीयूची चोरी झाली होती. या प्रकरणी बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
होता. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तपास पथकाला हा गुन्हा उघड करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार बारामती तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे संशयित लालमोहन मौर्य यास ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ११ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
फोटो ओळी : चोरी करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेताना पोलीस निरीक्षक महेश ढवाण, योगेश लंगुटे व पथक.