लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नाना पेठेतील शितळादेवी मंदिरातील देवीचे चांदीचे दागिने आणि रोकड असा ११ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. चोरट्यांनी चोरी करुन जाताना येथील सीसीटीव्ही रेकॉर्डरही चोरून नेला आहे़
शितळादेवी मंदिर काही वर्षांपूर्वी एका वाड्यात होते. वाडा पाडून तेथे सोसायटी बांधण्यात आली. सोसायटीच्या पार्किंगच्या परिसरात हे मंदिर आहे. मंदिराच्या चारही बाजूंनी इमारती आहेत.
रविवारी सकाळी परिसरातील नागरिक व पुजाऱ्यांना मंदिराचे कुलूप तोडण्यात आल्याचे दिसले. त्यांनी आत जाऊन पाहणी केली असता, देवीचे चांदीचे दागिने व दानपेटीतील रक्कम चोरीला गेल्याचे आढळले. यानंतर तेथील रहिवासी भारत कोटा (वय ४०) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्याने मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर त्याने मूर्तीचे दागिने व दानपेटीत जमा झालेली रक्कम चोरली. दानपेटीत नक्की किती रक्कम होती हे कळू शकले नाही. चोरट्याने जाताना सीसीटीव्हीचे रेकॉर्डरही चोरुन नेले. यामुळे मंदिर नक्की किती वाजता फोडण्यात आले व किती चोरटे होते हे समजू शकले नाही. पोलीस आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची माहिती घेऊन तपास करत आहेत.