पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला चोरट्यांनी चांगलाच दणका दिला आहे. दौंड-बारामतीदरम्यान विद्युतीकरणाचे काम सुरू असताना मागील काही दिवसांत रेल्वेची तब्बल ७१५ मीटर विद्युत तार चोरीला गेली असून लाखो रुपयांचा फटका बसला आहे. तसेच वाहतुकीवरही परिणाम झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
मागील काही महिन्यांपासून दौंड ते बारामती रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. त्यासाठी विद्युत तार (ओवरहेड वायर) टाकली जात आहे. यादरम्यान मागील काही दिवसांत काही भागात जोडण्यात आलेली ७१५ मीटर तार काही अज्ञातांनी चोरून नेली आहे. या प्रकारामुळे दि. २२ डिसेंबर रोजी रेल्वे वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला. तारेचे तुकडे मार्गावरच अस्ताव्यस्त पडले होते. त्यामुळे दौंड-बारामती पॅसेंजर ही गाडी रद्द करावी लागली. तसेच एका मालगाडीला खुप वेळ थांबविण्यात आले. चोरीप्रकरणी रेल्वेच्या वतीने पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून याबाबतचा तपास केला जात आहे.
विद्युतीकरणासाठी लावण्यात आलेली तारेमध्ये २.२ केव्ही क्षमतेचा विद्युत दाब सुरू असतो. दाबाची चाचपणी करूनच हे काम केले जाते. या काळात तारेला स्पर्श करणे धोकादायक आहे. हे काम करताना काहीवेळा अर्धवट स्वरूपात तार तिथेच सोडून देण्यात येते. चोरट्यांकडून याच तारेची चोरी केली जात आहे. या चोरीमुळे विद्युतीकरणाच्या कामावर विपरीत परिणाम होत आहे. तारा तोडून नेल्या जात असल्याने रेल्वेगाड्यांवर उच्च दाबाच्या तार पडून अपघात होण्याचा धोका आहे. ही स्थिती न सुधारल्यास रेल्वे वाहतुकीवर आणखी परिणाम होऊ शकतो. पोलिसांकडूनही चोरीच्या घटना थांबविण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रयत्न करायला हवेत, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.