घरफोडीमध्ये साधारणपणे ज्या घरी सध्या कोणी राहत नाही, अशा घरांवर पाळत ठेवून घरातील मौल्यवान दागिने, रोख रक्कम, महागड्या वस्तूंची चोरी केली जात आहे. सणासुदीच्या तोंडावर चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने नागरिकांची चांगलीच पळापळ झाली असून दैणा उडाली आहे.
राजेगावमध्ये गावठाण आणि ७-८ वाड्या-वस्त्या असा मोठा परिसर आहे. परिसरात सुमारे ५-६ हजार लोकसंख्या आहे. त्यामुळे अनेक प्रकारचे गुन्हे व भुरट्या चोऱ्या आता वाढीस लागल्या आहेत. या भागात काही कालावधी अंतराने साधारणपणे दोन महिन्यांच्या फरकाने चोऱ्या होत आहेत. त्यामुळे या भागात आता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील ग्रामस्थांनी पोलीस गस्तीची मागणी केली आहे. नागरिकांच्या घराची कडी धारदार हत्याराने कापून घरातील दागिने, रोख रक्कम चोरट्यांनी पसार केली आहे. काही ठिकाणी चोरीचे प्रयत्न अयशस्वीही झाले असल्याचे दिसून येत आहे.
राजेगावमध्ये चोरी करण्यासाठी आलेल्या अंदाजे पाच ते सहा चोरांनी एका घरात चोरी केली आणि नंतर त्या घराभोवती सीसीटीव्ही कॅमेरे असल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यानी चक्क ते सीसीटीव्ही मशीनच उचलून नेले. अशा प्रकारामुळे आता मात्र ग्रामस्थांच्या मनात भीती भरली आहे.
--
कोट
गावमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यरत आहे. चोरीची एखादी घटना घडलेली आढळल्यास एक फोन केला तर एकाच वेळी तो संपूर्ण गावातील नागरिकांना जातो. फक्त नागरिकांनी सतर्क राहून अशा घटना घडल्यानंतर त्वरित संपर्क केला तर यावर आळा घालता येईल.
महेश लोंढे, पोलीस पाटील