राजीव मुळ्ये --- सातारा -शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या पार्थिवावरील तिरंगा लष्करी जवानांनी घडी करून वीरपत्नी स्वाती महाडिक यांच्या हाती दिला आणि दु:ख-अभिमानाच्या मिश्रणातून त्यांचं मन भरून आलं. हा तिरंगा आता कायम त्यांच्याजवळ राहील. याच ध्वजासाठी कर्नल संतोष यांनी सर्वोच्च त्याग केला, याची अभिमानास्पद आठवण म्हणून!कर्नल महाडिक यांच्यावर गुरुवारी (दि. १९) पोगरवाडी येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हुतात्मा जवानाला निरोप देताना साऱ्यांचाच कंठ दाटतो परंतु निरोपाच्या विहित प्रक्रियेची माहिती नागरिकांना अभावानेच असते. आर्मी अॅक्ट, नेव्ही अॅक्ट आणि एअर फोर्स अॅक्टमध्ये नमूद केल्यानुसार ही प्रक्रिया पार पडते. युद्धात अथवा शांतीच्या काळातही ड्यूटीवर असताना कामी आलेला प्रत्येक जवान या इतमामास पात्र असतो. काही वेळा जवानाचे पार्थिव मिळून येत नाही. विशेषत: नौदलाच्या जवानाच्या बाबतीत अशी घटना घडू शकते. असा जवानही या इतमामास पात्र असतो. लष्करी शिस्तीला अनुसरून ही विहित प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी हुतात्मा जवानाच्या ‘पॅरेन्ट रेजिमेन्ट’ची असते. अगदी लष्करी वाहनातून पार्थिव कसे बाहेर काढायचे, इथपासून प्रत्येक बारीकसारीक बाबी ठरलेल्या आहेत. शवपेटी चितेजवळ ठेवल्यानंतर त्यावरील तिरंगा दोन जवान काढून घेतात. ठरलेल्या प्रक्रियेने त्याची घडी घातली जाते आणि तो तिरंगा हुतात्म्याच्या पत्नीकडे किंवा अन्य वारसाकडे सोपविला जातो. जवानाच्या बलिदानाचे स्मरण म्हणून हा ध्वज कायम त्याच कुटुंबात राहतो. अंत्यसंस्कारांपूर्वी मान्यवरांकडून पुष्पचक्र वाहण्यात येते. प्रत्येक पुष्पचक्रावर ते कोणाच्या वतीने वाहिले जात आहे, त्याचे नाव लिहिलेले असते. संबंधित नेता किंवा वरिष्ठ मुलकी अधिकाऱ्याकडून दोन जवान हे पुष्पचक्र ताब्यात घेतात आणि विशिष्ट प्रकारे पावले टाकत शवपेटीजवळ अर्पण करतात. लष्करात ‘धीरे चल’, ‘तेज चल’, ‘दौड के चल’ अशा एकंदर पाच प्रकारच्या ‘चाली’ असतात. हुतात्म्याला निरोप देतानाची सर्व प्रक्रिया ‘धीरे चल’ आदेशाने चालते. पुष्पचक्र वाहणारी व्यक्ती सहसा पार्थिवापर्यंत जात नाही. जवानच चक्र घेऊन जातात. पार्थिव चितेवर ठेवल्यानंतर बिगूल वाजतो. त्यावेळी मानवंदना देणारे सर्व जवान एकसाथ आपली रायफल उलटी करतात. हे शोकाचे निदर्शक असून, या प्रक्रियेला ‘शोकसत्र’ म्हटले जाते. त्यानंतर रायफली खांद्यावर घेऊन ‘फायरिंग’ केले जाते. ही जवानाच्या शौर्याला लष्कराने दिलेली सलामी होय.हुतात्मा जवान पदकविजेता असेल, तर निरोपाची ही विहित प्रक्रिया काहीशी बदलते. पदकाच्या दर्जानुसार मानवंदना दिली जाते. परमवीरचक्र, महावीरचक्र आणि वीरचक्र ही युद्धकाळात मिळणारी पदके असून, शौर्यचक्र हा शांतिकाळातील सर्वोच्च सन्मान आहे. त्या-त्या पुरस्कारानुसार सलामीची पद्धत ठरलेली असते आणि त्यानुसारच ती पार पडते. हुतात्म्याला निरोप देण्याची ही प्रक्रिया ‘पॅरेन्ट रेजिमेन्ट’च पार पाडते. तथापि, काही विशिष्ट परिस्थितीत ‘पॅरेन्ट रेजिमेन्ट’ला जवानाच्या मूळगावी जाऊन ही प्रक्रिया पार पाडणे शक्य नसते. दोन्ही परिस्थितीत ही बाब सरकारला कळविणे ही संबंधित रेजिमेन्टची जबाबदारी असते. निरोप देण्यासाठी येणे रेजिमेन्टला शक्य नसल्यास सरकारतर्फे तसे संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कळविले जाते. मग स्थानिक पोलिसांकडून शासकीय इतमामात हुतात्म्याला अंतिम मानवंदना देणे ही जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांकडे राहते. अभ्यासक्रामतच समावेशशासकीय इतमामात आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार यातील फरक अनेकांना माहीत नसतो. ज्येष्ठ नेते, मंत्री किंवा अन्य महत्त्वाच्या व्यक्तीचे निधन झाल्यावर त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात. तथापि, त्यात लष्कराची कोणतीही जबाबदारी नसते. ही प्रक्रिया पोलीस दलातर्फे पार पाडली जाते. लष्कर केवळ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान दर्जाच्या व्यक्तीचे निधन झाल्यासच सलामी देते. लष्करी इतमामात जवानावर अंत्यसंस्कार करण्याच्या प्रक्रियेचा समावेश ‘लीडरशिप रँक’च्या अभ्यासक्रमातच केलेला असतो. सामान्यत: ‘प्लाटून कमांडर’पदापासून ‘लीडरशिप रँक’चा अभ्यासक्रम शिकविला जातो.
या ध्वजासाठी ‘त्यांचे’ बलिदान!
By admin | Published: November 22, 2015 11:20 PM