पुणे : काँग्रेस आणि आम आदमी पक्ष (आप) वेगळे लढल्याने भाजपला फायदा झाला, असे म्हणण्यात काही तथ्य नाही. महाराष्ट्रात सर्व एकत्र होते, काय फरक पडला. काँग्रेससोबत आप पक्ष लढला असता तर त्याच्या २२ सुद्धा जागा निवडून आल्या नसत्या. काँग्रेसची साथ घेतली नाही, म्हणून आप पक्ष वाचला. ते दोघे एकत्र लढले असते तर सर्व ७० जागा भाजपच्या आला असत्या, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.
स. प. महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित हिंदू गर्जना प्रतिष्ठान कुस्ती चषक स्पर्धेस बावनकुळे यांनी शनिवारी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. समवेत भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, बालन ग्रुपचे पुनीत बालन उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले, दिल्लीत भाजपला मिळालेला विजय ऐतिहासिक आहे. दिल्लीतील ७० पैकी ४८ जागांवर भाजपला विजयी करून दिल्लीकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामावर विश्वास टाकला आहे. गृहमंत्री अमित शाह यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व जे. पी. नड्डा यांच्या संघटन कौशल्यामुळे २७ वर्षांनंतर भाजपला हा मोठा विजय मिळाला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी अजूनही महाराष्ट्राचा निकाल पचवत नाहीत. त्यांनी आत्मपरीक्षण करून संघटनेमध्ये फेरबदल केले असते. तर चांगले दिवस आले असते, असेही ते म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत कोणी दोषी आढळत नाही, तोपर्यंत कोणाचाही राजीनामा घेणार नाही. मुंडे दोषी निघाले तर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री योग्य ती कारवाई करतील.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बोलण्याइतकी उंची राहुल सोलापूरकरांची नाही. अशा व्यक्तीने महाराजांच्या इतिहासावर किंतु, परंतु करणे योग्य नाही, असेही बावनकुळे म्हणाले.