बारामती : गर्दी होणाऱ्या ठिकाणी शासकीय अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन पाहणी करावी. यावेळी कोरोना नियमावलीची उल्लंघन होत असल्याचे आढळल्यास सुरूवातीला नोटीस द्यावी. मात्र, दुसऱ्यांदाही हेच चित्र दिसून आल्यास संबंधित प्रतिष्ठान किंवा जागा १५ दिवसांसाठी सील करुन संबंधितांवर गुन्हा दाखल करावा, असे आदेश जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिले आहेत. पुणे जिल्ह्यात १८ फेब्रुवारीपासून नियमावली लागू करण्यात आली आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सतर्क झालेल्या प्रशासनाने अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
शहरातील मंगल कार्यालये, हॉल, लॉन्स, कोचिंग क्लासेस, खाजगी शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा / विद्यालय, महाविद्यालय, नाट्यगृह, चित्रपटगृहे, व्यायामशाळा, शॉपिंग मॉल्स, धार्मिक स्थळे, उद्याने, व इतर गर्दी होणारी स्थळे या ठिकाणी वेळोवेळी अचानक भेट देऊन तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोरोना नियमावलीचे उल्लंघन केल्यास प्रथम नोटीस देऊन दंड आकारावा. त्याच ठिकाणी दुसऱ्यावेळी उल्लंघन केल्यास प्रतिष्ठान १५ दिवसासाठी सील करावे, संबंधितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीला प्रथम ५०० रुपये व पुन्हा आढळल्यास १००० रुपये एवढा दंड आकारावा. सर्व हॉटेल, रेस्टॉरंट-उपहारगहे, बँक्वेट हॉल इत्यादी ठिकाणी नागरिकांना संचार करताना मास्क व सॅनिटाझर वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित विभागाच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे. गर्दी होणारे कोणतेही खासगी अथवा सार्वजनिक कार्यक्रमांना पोलीस स्टेशनमधून रितसर परवानगी घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. आरोग्य विभागाने कोरोनाचा संसर्ग वाढत असेल त्या भागात किंवा परिसरात टार्गेटेड पद्धतीने तपासण्या कराव्यात. प्रत्येक रुग्णांचे किमान २० तरी संपर्क शोधलेच पाहिजेत. ज्या भागात कोरोनाचा रुग्ण सापडला असेल, त्याठिकाणी निदान मायक्रो कंटेनमेंट तरी करावे. पेशंटच्या घरातील सर्वांची कोविड तपासणी करावी. वेगाने प्रसार करणाऱ्या (सुपर स्पेडर) संवर्गातील व्यक्तीची वारंवार तपासणी करून सकारात्मक चाचणी आल्यास विलगीकरण कक्षात ठेवावे. भाजी मंडई, दुकानदार अशा लोकांच्या ठराविक अंतराने नियमित कोरोना चाचण्या कराव्यात, असेही बजावण्यात आले आहे.
मंदिरामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांबाबत संबंधित मंदिराचे व्यवस्थापक संस्थान यांनी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच पास देताना ६५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व १० वर्षाखालील लहान मुले यांना, तसेच मास्क न वापरणाऱ्या भाविकांना पासेस देण्यात येऊ नयेत, अशा सूचनाही जिल्हाधिकारी देशमुख यांनी दिल्या आहेत.