पुणे : गेल्या चार-पाच वर्षात पक्षाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी खुद्द पक्ष प्रमुख राज ठाकरे सरसावले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि उमेद जागविण्यासाठी त्यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत. पुणे दौऱ्यावर आलेल्या ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना थेट ‘घरी जेवायला’ येणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र, चांगले काम करुन दाखविण्याची अट मात्र घालायला ते विसरले नाहीत. त्यांनी काही पदाधिकाऱ्यांशी ‘वन टू वन’ चर्चा देखील केली. त्यांच्या या आवाहनाची चर्चा सोमवारी दिवसभर मनसे कार्यकर्त्यांमध्ये होती.
आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. मनसेच्या नव्या शहर कार्यालयाच्या उद्घाटनासाठी पुण्यात आलेल्या पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पुण्याला पुन्हा आणखी तीन दिवस दिले आहेत. या तीन दिवसीय दौ-यात विधानसभानिहाय बैठका घेतल्या जात आहेत. त्याची सुरुवात सोमवारी झाली. राज ठाकरे यांनी सोमवारी सकाळच्या सत्रात वडगावशेरी आणि कोथरूड विधानसभा मतदार संघातील आणि दुपारच्या सत्रात कोथरूड आणि खडकवासला विधानसभा मतदार संघातील पदाधिका-यांशी संवाद साधला.
यावेळी मनसे नेते बाबू वागस्कर, शहराध्यक्ष वसंत मोरे, शहर महिला अध्यक्षा रुपाली पाटील-ठोंबरे, बाळा शेडगे, पालिकेतील गटनेते साईनाथ बाबर यांच्यासह कोअर कमिटीचे सदस्य, महीला आघाडीच्या पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. ठाकरे मंगळवारी हडपसर, कॅन्टोमेंट, कसबा आणि पर्वती मतदार संघातील पदाधिका-यांशी संवाद साधणार आहेत.===प्रभाग अध्यक्ष, उपाध्यक्ष ही पदे रद्द करून शाखाध्यक्ष, शाखा उपाध्यक्ष यांची नियुक्ती करण्याचे आदेश ठाकरे यांनी दिले. या शाखाध्यक्ष आणि उपाध्यक्षांची यादीही त्यांनी मागविली आहे. जो शाखा अध्यक्ष किंवा पदाधिकारी पक्षाचे काम उत्तमरित्या करील त्याच्या घरी जेवायला येऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.