भोसरी (पुणे) : ‘अजित पवार जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील, तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतील परफॉर्मन्स बघावा. मग त्यांना कळेल त्यांच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझा परफॉर्मन्स नक्कीच उजवा आहे,’ असा पलटवार शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी सोमवारी केला.
‘तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट, हे तुम्हीच ठरवा,’ असे आवाहन मतदारांना करत अजित पवार यांनी डॉ. कोल्हेंवर टीका केली होती. त्यावर भोसरीत आले असताना डॉ. कोल्हे यांनी पवार यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, अजित पवार फार मोठे नेते आहेत. मी फक्त एवढेच म्हणेन की, मी जे काही केले, ते स्वकर्तृत्वाने केले. माझे काका नटसम्राट नव्हते. अजित पवार जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील, तर त्यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतील परफॉर्मन्स बघावा. मग त्यांना कळेल की, त्यांच्या प्रदेशाध्यक्षांपेक्षा माझा परफॉर्मन्स नक्कीच उजवा आहे.
आढळराव-पाटील गेट वेल सून
‘बेसिक मुद्दे नसल्याने खोटं बोल, पण रेटून बोल, असे शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे चालले आहे. त्यांना पुन्हा एकदा गेट वेल सून! मेरे पास गाडी है, बंगला है, पैसा है, तुम्हारे पास क्या है, हा जुन्या जमान्यातील डायलॉग होता. आताच्या काळात असे म्हणतात, मेरे पास नेता है, मेरे पास पैसा है, सत्ता है, तुम्हारे पास क्या है, तर मी प्रामाणिकपणे सांगतो की, मेरे पास शिरूर मतदारसंघातली मायबाप जनता आहे,’ अशा शब्दात डॉ. कोल्हे यांनी निशाणा साधला.
राजकारणातील सुसंस्कृतता जपा
इंद्रायणीनगर भोसरीमध्ये प्रचारावेळी ज्येष्ठ नागरिकांकडून सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यावर टीका होत असताना डॉ. कोल्हे यांनी त्या नागरिकाच्या हातातील माइक काढून घेतला. ‘वळसे-पाटील रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांना या राजकारणाच्या रिंगणात ओढणे चुकीचे आहे. राजकारणातील सुसंस्कृतता प्रत्येकाने जपली पाहिजे. निवडणूक येते आणि जाते, पण राजकारणाचा स्तर घसरू नये, ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे,’ असे कोल्हे म्हणाले.