उद्धव धुमाळे
पुणे : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. यानिमित्त त्यांचे अमूल्य कार्य आणि अपुरी राहिलेली स्वप्न समजून घेऊन ती साकार करण्याच्या दिशेने ठाेस पाऊल टाकणे, म्हणजे खऱ्या अर्थाने जयंती साेहळा साजरा करणे हाेय. यानिमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे अभ्यासक डाॅ. अमोल देवळेकर यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना एक व्यापक पट मांडला.
डाॅ. बाबासाहेब आणखी काही वर्षे जगले असते, तर देशात बाैद्ध आणि जैन धर्मांत ऐक्य घडवून श्रमण क्रांती केली असती. बाबासाहेबांच्या आयुष्यातील शेवटच्या सहा दिवसांचा पट अनुभवला तर याचा प्रत्यय येताे. धार्मिक उन्नती हेच बाबासाहेबांचे उत्तर कार्य हाेते, असे माई आंबेडकर, नानकचंद रत्तू आणि चांगदेव खैरमाेडे यांच्या ग्रंथातून सूचित हाेते.
विविध स्तरांवर, वेगवेगळ्या क्षेत्रांत बाबासाहेबांनी उत्तुंग कामगिरी केली असली तरी त्यांची काही स्वप्ने अपुरी राहिली असून, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसे झाल्यास भारत महासत्ता हाेण्यापासून कुणीही राेखू शकणार नाही. पत्नी माई आंबेडकर, चरित्रकार धनंजय कीर, स्वीय सहायक नानकचंद रत्तू आणि अनुयायी चांगदेव खैरमोडे लिखित ग्रंथ यासाठी मार्गदर्शक ठरतात. त्यात आलेल्या उल्लेखानुसार, दि. ६ डिसेंबर १९५६ राेजी हाेणाऱ्या अखिल भारतीय जैन परिषदेत डाॅ. बाबासाहेब भूमिका मांडू शकले असते तर देशातील चित्र निश्चितच वेगळे असते, असे डाॅ. देवळेकर म्हणतात.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करण्यासाठी दि. ४ डिसेंबर १९५६ राेजी सकाळी अकराच्या सुमारास ‘जैन’ धर्माचे काही लोक घरी आले हाेते. या मंडळींनी बाबासाहेबांशी जैन आणि बौद्ध धर्मांतील तत्त्वांची सम आणि विषम स्थळे यावर प्रदीर्घ चर्चा केली. तसेच ‘श्रमण परंपरेतील या दाेन्ही धर्मांतील लोकांचा मिलाफ करण्याच्या दृष्टीने आपण योजना आखावी,’ अशी विनंती जैन धर्मगुरूंनी बाबासाहेबांना केली. त्यावर बाबासाहेब म्हणाले, ‘यासंबंधी आपण उद्या (दि. ५ डिसेंबर १९५६) रात्री अधिक चर्चा करू,’ असे म्हणून निराेप घेतला. ही माहिती सर्व चरित्रकारांनी आपल्या लेखनात नमूद केली आहे.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी (दि. ५ डिसेंबर १९५६) जैन मंडळी बाबासाहेबांना भेटण्यास येणार हाेती. तत्पूर्वी बाबासाहेबांनी आपल्या ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेवर शेवटचा हात फिरवला. ठरल्याप्रमाणे जैन शिष्टमंडळ आले. खरे तर त्या दिवशी बाबासाहेबांचे स्वास्थ्य चांगले नव्हते. त्यामुळे नानकचंद रत्तू यांच्याकडे त्यांनी निरोप दिला की, ‘मी फार थकलो आहे. त्यांना उद्या बोलवा.’ क्षणात सांगतात, त्यांना थांबायला सांग. आणि बाबासाहेब आवरून त्यांना भेटतात. जैन विद्वानांनी बाबासाहेबांना नमस्कार केला. त्यांच्यात बौद्ध आणि जैन यांचे धार्मिक ऐक्य घडवण्यासाठी काय करता येईल? यावर चर्चा झाली.
त्याच्या दुसऱ्याच दिवशी अर्थात दि. ६ डिसेंबरला जैनांचे एक संमेलन दिल्लीत भरणार होते, त्याविषयी शिष्टमंडळाने बाबासाहेबांना माहिती दिली. त्यात ‘बौद्ध धर्म आणि जैन धर्म’ या विषयावर बाबासाहेबांनी मत मांडावे, अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. जैन मंडळींनी बाबासाहेबांना सदिच्छा भेट म्हणून ‘श्रमण संस्कृति की दो धाराएँ : जैनिजम और बुद्धिजम’ ही पुस्तिका भेट दिली. बाबासाहेबांनी ती पुस्तिका चाळत आस्थापूर्वक व तपशीलवार चर्चा केली. बाबासाहेबांचे जैन आणि बौद्ध या दोन्ही धर्मांचे सखोल आकलन बघून जैन शिष्टमंडळ अतिशय प्रभावित झाले. तसेच ‘६ तारखेला संध्याकाळी ठरवूया,’ असे त्यांनी बाबासाहेबांना सांगितले.
श्रमण परंपरेतील बौद्ध आणि जैन हे दोन वेगवेगळे विचारप्रवाह नसून, त्या एकाच वृक्षाच्या वेगवेगळ्या फांद्या आहेत. त्यांच्यातील साम्यस्थळे बघता भविष्यात हातात हात घालून काम करतील. यासाठी श्रमणपरंपरा पुनर्जीवित करणे हे ऐतिहासिक कार्य आहे; कारण हे दोन्ही धर्म माणसाला आत्मकल्याणकारी, अंत:प्रज्वलित, डोळस बनवतात. बाबासाहेबांचे विवेचन शिष्टमंडळाला मनापासून पटले. त्यावर ‘असे असल्यास आम्हीसुद्धा आपले नेतृत्व स्वीकारू आणि या परंपरेचे पाईक होऊ,’ असे आश्वासन जैन शिष्टमंडळाने बाबासाहेबांना दिले आणि तपशीलवार कार्यक्रम ठरवूया, असे सांगत निरोप घेतला, असा उल्लेख अनेक ग्रंथात आहे.