पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघासह पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरु असणाऱ्या पीएमपीएमएलच्या बससेवा बंद करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यावरून खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच संतापल्या असून गोरगरीबांची मुलं शिकावीत असं पीएमपीएमएलच्या कर्त्या-धर्त्यांना वाटत नाही का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. या सगळ्या मार्गांवरील बससेवा सुरू ठेवा अन्यथा आपण स्वतः आंदोलन करू, असा इशाराच त्यांनी दिला होता.
ग्रामीण भागातील पीएमपी सेवा पुन्हा सुरू करावी, अन्यथा आंदोलन करू असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी त्यांना खरमरीत उत्तर दिले आहे. सुळे यांनी पूर्ण माहिती घेतल्यास त्यांचा पत्रकार परिषदा तसेच आंदोलन करण्याचा निम्मा वेळ वाचेल अशी खोचक टीका पाटील यांनी केली. ते म्हणाले, “कोरोना काळात एसटची सेवा बंद होती. ग्रामीण भागातील जनतेचे त्यामुळे हाल होत होते. त्यादृष्टीने पीएमपीची ग्रामीण भागात ही सेवा सुरू करण्यात आली होती. आता कोरोना काळ संपला आहे. एसटीनेही ही सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत पीएमपीला पत्र दिले होते. त्यामुळे पीएमपीने शहराच्या वाहतुकीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी ग्रामीण भागातील सेवा बंद करण्याचे ठरवले आहे. ते योग्यच आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल - सुप्रिया सुळे
पीएमपीएमएल प्रशासनाला आपली कळकळीची विनंती आहे. ग्रामीण भागांतील या बससेवा कायम ठेवा. त्या बंद झाल्यास अथवा ज्या बंद केल्या आहेत त्या मार्गावरील बससेवा पुर्ववत सुरु झाल्या नाहीत, तर गोरगरीबांच्या हक्कासाठी, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आणि सर्वसामान्यांच्या हक्काच्या प्रवासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनात मी स्वतः उतरेन याची कृपया आपण नोंद घ्यावी, असा इशारा त्यांनी दिला आहे.