पुणे : पुण्यासाठी रिंग रोड महत्त्वाचा आहे. त्याच्या भूसंपादनासाठी १० हजार कोटी, तर रिंग रोड उभा करण्यासाठी २० हजार कोटींचा खर्च आहे. येत्या दहा वर्षांमध्ये या सर्व निर्मितीचे मूल्य एक ते दीड लाख कोटींवर जाणार आहे. भूसंपादनासाठीचे १० हजार कोटी रुपये कसे उभे करायचे, त्यासाठीचे इनोव्हेटिव्ह माॅडेल पुणेकरांनी सांगावे. आम्हीपण त्यावर विचार करत आहोत. यंदा जागेचे संपादन करायचे आहे, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मराठा चेंबर ऑफ काॅमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरची सर्वसाधारण वार्षिक सभा रविवारी झाली. त्यात फडणवीस बोलत होते. याप्रसंगी मराठा चेंबरचे मावळते अध्यक्ष सुधीर मेहता, नियोजित अध्यक्ष दीपक करंदीकर, माजी अध्यक्ष प्रतापराव पवार, कार्यकारी संचालक प्रशांत गिरबने उपस्थित होते. मावळते अध्यक्ष मेहता यांनी नियोजित अध्यक्ष करंदीकर यांना सूत्रे सुपूर्द केली. मराठा चेंबरच्या कार्याच्या अहवालाचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते झाले.
फडणवीस म्हणाले...
- मॅन्युफॅक्चरिंगमध्ये पुणे हे कॅपिटल आहे. इकोसिस्टीम चांगली तयार केल्याने ग्लोबल स्टार्टअप इंडेक्समध्ये चांगले स्थान मिळविले आहे. पुण्याचा विकासात मराठा चेंबर संस्थेचे योगदान आहे.
- महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर गेल्यावरून वाद होत आहेत; पण तो प्रकल्प महाराष्ट्रात येणारच नव्हता. कारण तेव्हाचे गृहमंत्री जेलमध्ये जात होते. मुख्यमंत्र्यांचे लक्ष नव्हते. मोठ्या प्रकल्पांना महाराष्ट्रात आणण्याची इच्छा कोणाचीच नव्हती.
- पुण्याच्या जीडीपीत विमानतळाचा मोठा वाटा आहे. दुसरे विमानतळ पुरंदरला करणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही केंद्राकडून सर्व परवानग्या आणल्या आहेत. भूसंपादन करायचे असून, चांगले पैसे दिले की लोकं जागा देतील. मल्टीमाॅडेल कार्बो व लाॅजिस्टिक पार्क तयार करण्याचा विचार सुरू आहे.
- माथाडी कामगारांत ब्लॅक माथाडीदेखील आहेत. राजकीय नेतेही त्यात आहेत. ते गब्बर झाले आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली जाईल.
...तर अजित पवारांना गुरूमंत्र देईन : फडणवीस
...तर अजित पवारांना गुरूमंत्र देईन : फडणवीस
सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद घेऊन देवेंद्र फडणवीस काम कसे करणार? अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बारामतीत रविवारी केली होती. त्यावर फडणवीस म्हणाले, मी अख्खा महाराष्ट्र सांभाळला आहे. त्यामुळे सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद काहीच नाही. कधी त्यांचे राज्य आलेच तर त्यांना मी सहा जिल्ह्यांचे पालकमंत्रिपद कसे सांभाळतात, याचा गुरूमंत्र देईन, असा टोलाही अजित पवार यांना मारला.