Ajit Pawar Speech ( Marathi News ) : बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी कंबर कसली आहे. कारण या मतदारसंघात महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या निवडणूक रिंगणात आहेत. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार हे बारामती लोकसभा मतदारसंघात येणारे सर्वच तालुके पिंजून काढत असून नुकतीच त्यांची भोर इथं सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवारांनी भोरवासीयांना एमआयडीसीचं आश्वासन दिलं असून हे आश्वासन पूर्ण करू शकलो नाही तर मी पुन्हा या लोकसभा मतदारसंघात माझा उमेदवार देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
"आधी बोलताना कोणीतरी सांगितलं की, दादा आम्ही तुमच्या उमेदवाराला निवडून देतो. पण तुम्ही निवडून आल्यानंतर या भागात एमआयडीसी नाही आणली तर आम्ही पुढच्या निवडणुकीत तुमच्या उमेदवाराला साथ देणार नाही. अरे तुम्ही सांगण्यापेक्षा मी जर हे काम केलं नाही तर मीच परत लोकसभेला उभं राहणार नाही. कारण माझंच मन मला खाईल की आपण सांगितल्याप्रमाणे इथं काम केलं नाही. पण मी असं होऊ देणार नाही. मी भोर-वेल्हा परिसरात एमआयडीसी आणणार," असं अजित पवारांनी सभेत बोलताना म्हटलं आहे.
सुप्रिया सुळेंवर जोरदार टीका
भोर-वेल्ह्यातील जनतेला विविध आश्वासनं देत असताना अजित पवार यांनी विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली. "आताचे खासदार हे बारामतीत मी केलेली कामे स्वत: केली असल्याचे सांगत आहेत. बारामतीतील सर्व शासकीय इमारती मी बांधल्या आहेत. पण त्यांनी त्यांच्या कार्य अहवालाच्या पुस्तकात या कामांचे फोटो टाकले आहेत. नुसती भाषणं करून लोकांची कामं होत नाहीत. नाही तर मीही सकाळी ७ पासून रात्रीपर्यंत भाषणे केली असती. पण त्याला कामाचीही जोड हवी. कामे होण्यासाठी प्रशासनावर तुमची पकड पाहिजे. तुम्ही सांगितलेलं काम पूर्ण करण्यासाठी तसा दरारा पाहिजे आणि तसा दरारा आताच्या खासदाराचा नाही," असा हल्लाबोल अजित पवारांनी केला आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी विकासकामांवरून केलेल्या टीकेला आता सुप्रिया सुळे कसं प्रत्युत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.