पुणे:‘‘ मी जगभर फिरलो. अनेक देशात राहिलो. सर्वत्र खूप छान अनुभव आले. पण कुठेही गेलो तरी आपला शेजारी मात्र बदलता येत नाही. हे सत्य आहे. आपल्या शेजारी पाकिस्तान असून, तिथे आपल्याकडून चहा निर्यात होतो. पण कधी कधी तो लांबून दुबई मार्ग जातो, तर कधी स्मगलिंगच्या मार्गाने जातो. आज पाकिस्तानसाठी खूप काही करता येऊ शकले असते, परंतु, दोन्ही देशाचे संबंध चांगले नाहीत. खरंतर दोन्ही देश आनंदात राहू शकले असते, पण हे झाले नाही,’’अशी खंत भारताचे परराष्ट्र खात्याचे माजी सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी व्यक्त केली.
आर्याबाग सांस्कृतिक परिवारातर्फे आयोजित आणि ज्ञानेश्वर मुळे लिखित 'माणूस आणि मुक्काम ' या पुस्तकाचे प्रकाशन माजी भारतीय वनसेवा अधिकारी रंगनाथ नाईकडे यांच्या हस्ते झाले. या वेळी आर्याबाग सांस्कृतिक परिवाराचे संस्थापक कल्याण तावरे, चांगुलपणाची चळवळचे अध्यक्ष राज देशमुख, प्रकाशन दिलीप चव्हाण, विराज तावरे आदी उपस्थित होते.
मुळे म्हणाले,‘‘मी माझ्या विदेशात काम केलेल्या अनुभवावर हे पुस्तक लिहिले आहे. यापूर्वी हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत प्रकाशन झाले आहे आणि आज मराठीमध्ये प्रकाशन होत आहे. पुस्तक लिहिणं ही एक तपश्चर्या आहे. पुस्तके आपल्याला खूप काही शिकवून जातात. त्यात अनुभवांचे बोल असतात. मी कादंबरी लिहिली नाही, तो माझा पिंड नाही. अनुवभवांची शिदोरी या पुस्तकात तुम्हाला चाखायला मिळेल.’’
जगातल्या दहा देशातील पंतप्रधान आपले भारतीय आहेत. आपल्या देशासाठी काम करायचे सोडून इथले लोकं परदेशी जातात. साडेतीन कोटी लोकं विदेशात स्थायिक आहेत. मोठ्या पदावर आहेत. हे लोक इथून का गेले? का भारतीय व्यक्ती बाहेर जातो. नोबेल का मिळत नाहीय आपल्याला ? हा देश समृद्ध झाला पाहिजे ना ! आजही ३०-४० कोटी लोकं अशी आहेत, ज्यांना सर्व सुविधा मिळत नाहीत. केवळ दहा टक्के लोकांकडे संपत्ती आहे. अशाने देश सर्वंकष प्रगती कशी करेल, अशी खंतही मुळे यांनी व्यक्त केली.
...पण ते आपण विसरतोय की काय?
आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष झाली आहेत. आता आपण धर्म-जातीच्या पलीकडे जायला हवं. वैश्विक विचार रूजवायला हवा. संत तुकोबांनी हे विश्वची माझे घर असे म्हटलेच आहे. पण ते आपण विसरतोय की काय ? आपली संस्कृती ही सर्वांना सामावून घेणारी आहे. त्याप्रमाणे आपण वागले पाहिजे. - ज्ञानेश्वर मुळे