...तर केरळवासियांना साथीच्या अाजारांचा धाेका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2018 06:25 PM2018-08-26T18:25:17+5:302018-08-26T18:26:44+5:30

केरळमधील पूर अाेसरला असला तरी पसरलेल्या अस्वच्छतेमुळे केरळवासियांना साथीचे अाजार हाेण्याची वर्तविण्यात येत अाहे.

...then keral citizen may face problem of viral diseases | ...तर केरळवासियांना साथीच्या अाजारांचा धाेका

...तर केरळवासियांना साथीच्या अाजारांचा धाेका

googlenewsNext

पुणे : केरळमधील पुर ओसरला तर अजूनही स्थिती भयानक आहे... अनेकांचा संसार वाहून गेलाय... सामानाची शोधाशोध सुरू आहे... घरे, परिसर, रस्त्यांची साफसफाई केली जातेय... पण महापूराने घातलेल्या थैमानाने अजूनही अनेक भागात घाणीचे साम्राज्य आहे... मेलेली जनावरे ठिकठिकाणी दिसतात... लोकांमध्ये त्वचेचे आजार, उलट्या, जुलाबाचे प्रमाण अधिक आहे... त्यामुळे लवकरात लवकर स्वच्छता न झाल्यास केरळवासियांना मोठ्या प्रमाणावर साथीच्या आजारांचा सामना करावा लागू शकतो... ही स्थिती मांडली आहे ससून रुग्णालयातून केरळमध्ये गेलेल्या डॉक्टरांच्या पथकाचे प्रमुख डॉ. गजानन भारती यांनी.

    ससून रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी असलेले डॉ. भारती यांच्या नेतृत्वाखाली २६ डॉक्टर्स दि. २० आॅगस्ट रोजी केरळमध्ये गेले आहेत. अजून दोन-तीन दिवस ते तिथे वैद्यकीय सेवा देऊन पुन्हा पुण्यात परतणार आहेत. मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत आहे. केरळमधील एर्नाकुलम, अल्लप्पी आणि थ्रिसुर या तीन जिल्ह्यांमध्ये पावसाने सर्वाधिक थैमान घातले आहे. या भागातच डॉ. भारती व त्यांचे सहकारी मागील सात दिवसांपासून मदत छावण्यांमधील लोकांची सेवा करीत आहेत. दररोज शेकडो जणांवर उपचार करून त्यांना मानसिक आधारही द्यावा लागत आहे. मागील आठ दिवसांत पाऊस थांबल्याने पुरही पुर्णपणे ओसरला आहे. पण या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे प्रमाण खुप मोठे आहे. ही स्थिती पुर्ववत करण्यासाठी आणखी काही दिवस जावे लागणार आहेत.

    मागील सात दिवसांत ठिकठिकाणी जाऊन डॉक्टरांनी लोकांवर उपचार केले आहेत. याविषयी माहिती देताना डॉ. भारती म्हणाले, तेथील जिल्हा रुग्णालयांकडून छावण्यांची माहिती दिली जात आहे. तसेच तिथे जाण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था केली जाते. त्यानुसार तीन जिल्ह्यांमधील छावण्यांमध्ये जाऊन दिवसभर उपचार केले जात आहे. मदतीचा ओघ मोठा असल्याने पुरेशी औषधे, साहित्य उपलब्ध आहे. मागील काही दिवसांत नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला आहे. मानसिक ताणातून त्यांना जावे लागत आहे. तसेच सध्या पुरामुळे पिण्यासाठी स्वच्छ पाणीही सहजासहजी मिळत नाही. अनेक लोक अजूनही शाळा, चर्च, मंदीरे, तात्पुरत्या छावण्यांमध्ये एकत्र राहत आहेत. इथे गरीब, श्रीमंत सर्वच जण आहेत. 
---------------
साफसफाईची अावश्यकता 
सध्या तेथील नागरिकांना डोकेदुखी, अंगदुखीच्या तक्रारी खुप आहेत. पाण्याच्या समस्येमुळे जुलाब, उलट्या यांसह अन्य जलजन्य आजार आहेत. सतत पाण्यात राहिल्याने अनेकांना त्वचेचे आजार झाले आहेत. अद्याप कोणत्याही साथीच्या आजारांचा धोका नाही. मात्र, अनेक ठिकाणी प्रवासादरम्यान रस्त्याच्या आजूबाजूला मेलेली जनावरे आढळून आली. अनेक भागातील अजूनही साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही जनावरे आता कुजण्यास सुरूवात झाली आहे. हे प्रमाण वाढत गेल्यास साथीचे आजार पसरण्याचा धोका आहे. साथीचे आजार एका दिवसात पसरत नाहीत. त्यासाठी किमान पंधरा दिवस जावे लागतात. त्यामुळे पुढील काही दिवसांत साफसफाई वेगाने व्हायला हवी, असे डॉ. भारती यांनी सांगितले.
---------------
ओनमचा उत्साह नाही  

पुर ओसरला असला तरी अजूनही जवळपास ८० टक्के नागरिक छावण्यांमध्येच आहेत. पुराचे पाणी दोन मजल्यांपर्यंत गेले होते. त्यामुळे अनेकांचा संपुर्ण संसार पुरात वाहून गेला आहे. घरांची स्थिती खुप वाईट आहे. त्यामुळे अनेक जण दिवसभर त्यांच्या घराची साफसफाई करतात. केवळ जेवण व झोपण्यासाठीच छावणीत येतात. त्यामुळे दोन दिवसांपुर्वी ‘ओणम’ हा सण सुरू होऊनही त्याचा उत्साह दिसत नाही. स्वच्छता करूनच आपल्या घरात सण साजरा करायचा, असे म्हणून ते कामाला लागले आहेत. 

Web Title: ...then keral citizen may face problem of viral diseases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.