पुणे : देशभरातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे हे चांगलं काम करत असल्याने लोकप्रिय ठरल्याचं सांगितले जात आहे, असे असेल तर उद्धव ठाकरेंना पंतप्रधान करावे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे़
कॉँग्रेसने इंधन दरवाढीविरोधात सुरू केलेल्या राज्यव्यापी आंदोलनासाठी चव्हाण पुण्यात आले असताना, कॉँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार मोहन जोशी, अॅड. अभय छाजेड, गटनेते आबा बागूल, सोनाली मारणे, रमेश अय्यर आदी उपस्थित होते़
चव्हाण म्हणाले, आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री अकार्यक्षम आहेत याचा साक्षात्कार पंतप्रधान मोदी यांना झाला असून, कोरोना आपत्तीत व शिक्षण क्षेत्रात केंद्र सरकार हे कमी पडले याचा हा कबुलीजबाबच आहे़ परंतु, हे मंत्री अकार्यक्षम होते तर त्यांना मंत्रिपदावर का ठेवले यामुळे देशाचे किती नुकसान झाले याला जबाबदार कोण, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला़ दरम्यान, कुठल्याच केंद्रीय मंत्र्यांना कुठलाच अधिकार नसून सर्व निर्णय हे नरेंद्र मोदीच घेत असल्याचेही ते म्हणाले़
मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या नावाखाली फेररचना करून, बारा मंत्र्यांचे राजीनामे घेणे म्हणजे त्यांचा अवमान करणेच होय़. केंद्रात यापूर्वीपासून सहकार विभाग कार्यरत असून, सहकार विभागाला स्वतंत्र सचिव होते. तर हा विभाग कृषी मंत्रालयाअंतर्गत येत होता. परंतु, गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे हे खाते देण्यासाठी सहकार हे स्वतंत्र मंत्रालय केले आहे़ केंद्र सरकारने असा निर्णय का घेतला यातून कोणाला काय मिळणार आहे लवकरच स्पष्ट होईल, असेही चव्हाण म्हणाले़
सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचे केंद्र सरकारचे काम
कोरोना आपत्तीत सर्वसामान्यांना दिलासा न देता, केंद्र सरकार इंधन दरवाढीच्या रूपात नागरिकांच्या खिशातून जिझिया कर वसूल करत आहे. गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात २३ टक्के, डिझेलच्या दरात २८ टक्के तर गॅस सिलिंडरच्या दरात ४१ टक्के वाढ केली. जानेवारी २१ पासून आजपर्यंत म्हणजे पेट्रोल डिझेलचे दर ६६ वेळा वाढले आहेत. सरकार मात्र कंपन्यांना करसवलत देऊन सरकारी कंपन्या विक्रीस काढून जनतेला वेठीस धरत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले़