पुणे : २६/११च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब याला पाहिल्यावर हा छोटा मुलगा काय गोळीबार करणार? असे वाटले होते. तोवर जनतेने त्याला मारून त्याचा हनुमान केला होता. साहेब, मी बिल्डरकडे बॉडीगार्ड आहे. फायरिंग सुरू झाल्यावर मी लपलो... हे कसाबने सांगितल्यावर मला त्याच्या सांगण्यात तथ्य वाटले. हा खरा अतिरेकी नाही, असे वाटले होते. सत्र न्यायालयात केस उभी राहिली तेव्हा त्याने माझी केस इथे चालवू नका, मी बालगुन्हेगार असल्याचा दावा केला. त्यावर न्यायालय म्हणाले, ‘कसाब उभे राहा.’ तेव्हा हा बालगुन्हेगार नाही, मोठा आहे असे सांगून त्याचा बचाव न्यायालयाने फेटाळला. त्यावेळी सरकारी वकिलांनी कसाबची संपूर्ण चौकशी करण्याचा अर्ज केला. पाच साक्षीदारांना तपासले. ती चौकशी जर झाली नसती तर कदाचित त्याला २०२२ नंतरच फाशी झाली असती, असा खुलासा मुंबई दहशतवादी हल्ल्याचे मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांनी केला.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या हस्ते रमेश महाले यांना ‘कै. वसंतराव ढुमणे कृतज्ञता सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्यानंतर राजेश दामले यांनी महाले यांची मुलाखत घेतली. त्यावेळी महाले यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण थरार कथन केला. यावेळी अजय ढुमणे, सोहनलाल सोनिगरा आणि नीलेश सोनिगरा उपस्थित होते.
अनेकदा पोलिस तपास करतात. मात्र, न्यायालयात त्याचे योग्य पद्धतीने सादरीकरण होत नाही, अशी खंत व्यक्त करताना महाले म्हणाले, पाकिस्तान पुरस्कृत अनेक हल्ले हे २०१८ पूर्वी झाले आहेत. पण पाकिस्तानने ते हल्ले केल्याचे कधी मान्य केले नव्हते. पण आम्हाला जो पुरावा मिळाला त्यात पाकिस्तानने हा कट आमच्या देशात रचला गेला, हे मान्य केले. आम्ही न्यायालयीनदृष्ट्या हे सिद्ध केले. मुंबई दहशतवादी हल्ल्यातील साक्षीदारांना असे वाटत होते की, आम्ही साक्ष दिली तर दाऊद इब्राहिमचे लोक आम्हाला मारतील. पण आम्ही लोकांना विश्वासात घेतले. हा खटला चार वर्षे चालला पण एकही साक्षीदार फितूर झाला नाही.
मुंबई किनारपट्टीवर दहशतवादी हल्ला होणार आहे, याची पूर्वकल्पना देण्यात आली असूनही त्याकडे दुर्लक्ष झाले का? असे विचारले असता ते म्हणाले, समुद्र अथांग आहे. हल्ला होणार, असे रिपोर्ट येतच असतात. अनेकदा खोटी माहितीही दिली जाते. खरंतर खोटी माहिती देणाऱ्यांवर कारवाईसाठी कडक कायदा पाहिजे. खोटी माहिती देणाऱ्याला कमीत कमी १८ दिवस पोलिस कोठडीत ठेवायला हवे, असेही महाले म्हणाले.
ॲड. निकम म्हणाले, हा केवळ रमेश महाले यांचा सत्कार नाही तर तमाम पोलिस बांधवांचा सत्कार आहे. महाले यांच्यासारखे कर्तबगार आणि प्रामाणिक लोक पोलिस दलाला हवे आहेत. पोलिस दलात अनिष्ट प्रथा आहेत. ज्यावेळी राजकीय स्थित्यंतरे होतात, तेव्हा कुणाचे ऐकायचे? असा प्रश्न पोलिसांना पडतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
बिर्याणी ही कपोलकल्पित कहाणी
कारागृहात असताना कसाबला बिर्याणी दिली जात होती, यावरून पोलिसांवर टीकेची झोड उठली होती. पण बिर्याणी ही कपोलकल्पित कहाणी होती, असा खुलासा ॲड. निकम यांनी केला. मीच मीडियाला हे सांगितले होते आणि त्यांनी त्याची ब्रेकिंग न्यूज बनवली होती. राजकीय नेत्यांनी गोबेल्स प्रचार केला होता. मीडियाला कसे टॅकल करायचे, त्याचा तो भाग होता, असे निकम यांनी स्पष्ट केले.