पुणे : उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्याचा आयोजनानंतर कोरोना संसर्ग वाढल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “संंमेलनापेक्षा लोकांच्या जगण्याला प्राधान्य आहे. जर संंमेलन घेतले असते तर माझा ‘योगी आदित्यनाथ’ झाला असता.”
यंदाचे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होणार आहे. यासाठी २६ ते २८ मार्च हा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र कोरोना साथीमुळे अजूनपर्यंत संमेलन होऊ शकलेले नाही. “संमेलनापेक्षा लोकांचा जीव अधिक प्रिय आहे. संमेलनाबाबत घाई करण्यात कोणताही अर्थ नाही. परिस्थितीचा अंदाज घेऊन आणि सरकारच्या नियमावलीचे पालन करूनच संमेलनाचे आयोजन केले जाईल,” अशी भूमिका महामंडळाने घेतली आहे. त्यामुळे संमेलनाच्या आयोजनाबद्दलची अनिश्चितता कायम आहे.
नाशिक संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झाली आहे. डॉ. नारळीकर यांच्या रूपाने वाचकप्रिय, ज्येष्ठ लेखक संमेलनाध्यक्ष लाभल्याने संमेलनाबद्दलची उत्सुकता आहे. या पार्श्वभूमीवर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी अजून संकट संपलेले नाही. त्यामुळे संंमेलनाचा विषय काढणार देखील नाही. राज्य सरकारकडून परवानगी नसल्याने संमेलनाच्या आयोजनाचा विचार तूर्तास तरी केलेला नाही. महिनाभर कोरोनाबाबतचे चित्र काय आहे ते पाहावे लागेल.”
जानेवारीनंतर कोरोना निवळण्यास सुरुवात झाल्यानंतर संमेलनाच्या कामाला पुन्हा सुरूवात केली. मात्र पुन्हा कोरोना वाढण्यास सुरूवात झाली आणि लोकांच्या हितासाठी संंमेलन स्थगित करण्याची वेळ आली. संमेलनासाठी राज्य सरकारकडून पन्नास लाख रुपयांचा निधीला मान्यता मिळालेली आहे. पण, संमेलनच झाले नाहीतर सरकार निधी का देईल? जेव्हा संंमेलन होईल तेव्हा पैसे मिळतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.