बारामती : ‘दशक्रिया’ हा चित्रपट थोतांड बंद करणारा लोकहितवादी चित्रपट आहे. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित करावा; अन्यथा या ठिकाणी कोणताही चित्रपट चालू देणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार यांनी येथील थिएटरमालकांना दिला आहे.पवार यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष विनोद जगताप, बारामती शहराध्यक्ष अजित भोसले यांनी हा इशारा दिला आहे. याबाबत थिएटरमालकांना संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदन देण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला ‘दशक्रिया’ चित्रपट अंधश्रद्धा निर्मूलन करणारा आहे; तसेच थोतांड बंद करणारा लोकहितवादी चित्रपट आहे. या चित्रपटाला काही संकुचित विचारांच्या लोकांनी विरोध केला आहे. त्यांचा संभाजी ब्रिगेड निषेध करीत आहे. विज्ञानवादी महाराष्ट्रात मोजक्या लोकांच्या विरोधामुळे थिएटरमालक हा चित्रपट प्रदर्शित करणार नसल्यास हे खपवून घेतले जाणार नाही. या वेळी संतोष तावरे, सचिन अनपट, कांतिलाल काळकुटे, धीरज वाबळे, अजय भोसले, तुषार सातव, अक्षय थोरात, रोहित साळुंके, विकी चौधर, प्रशांत नाळे, नितीन मोरे, प्रसाद माने उपस्थित होते.
...तर कोणताही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:28 AM