पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील पाणीसाठा वेगाने कमी होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचे ऑगस्टपर्यंतचे नियोजन करण्यासाठी येत्या मंगळवारी (दि. १८) महापालिका आणि पाटबंधारे विभागाची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत पाण्याच्या नियोजनावर चर्चा होणार आहे.
पुणे शहराला खडकवासला धरण साखळीतून पाणीपुरवठा केला जातो. त्याचबरोबरच दौंड आणि इंदापूर या दोन तालुक्यांच्या सिंचनासाठी पाणी दिले जाते. मागील वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने या धरणसाखळीत शंभर टक्के पाणीसाठा होता. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत आजअखेर सुमारे १२. ५० टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यसरकारच्या आदेशानुसार, महापालिकेने यापूर्वीच पाटबंधारे विभागाकडे ऑगस्ट अखेरपर्यंत पाणी पुरवठ्यासाठी ७. ९४ टीएमसी पाण्याची मागणी केलेली आहे. यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे होणारे बाष्पीभवन, पाणीगळती आणि महापालिकेकडून होणारा पाणीवापर यामुळे धरणसाखळीतील पाणीसाठा झपाट्याने कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच मॉन्सून उशिरा सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे, पाऊस लांबल्यास अथवा कमी झाल्यास तीव्र पाणीटंचाईचा सामना शहराला करावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने आतापासून पाणी वापर कमी करण्यासह उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याचे आदेश महापालिका आणि च पाटबंधारे विभागाला दिले असल्यामुळे ही बैठक होणार आहे.
धरणातील पाणी वेगाने कमी होत असताना, पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. तरीही शहरात पाण्याचा बांधकाम, हॉटेल तसेच व्यावसायिक ठिकाणी स्वच्छतेच्या कामासाठी होणारा वापर, पिण्याचे पाणी टॅंकरद्वारे चोरुन विकणे, महापालिकेच्या कामांसाठी चोरुन पाणी वापरणे, वॉशिंग सेंटर, स्वच्छतागृहांमध्ये पिण्याचे वापरले जाणारे पाणी, उद्याने तसेच शासकीय कार्यालयांमध्ये गळक्या नळांमुळे वाया जाणारे पाणी हे रोखणे आवश्यक आहे. महापालिकेकडून याबाबत काहीच हालचाल केली जात नाही.