पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या उरुळी देवाची आणि फुरसुंगी गावाची नवीन नगरपालिका करण्याचा निर्णय घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय ऑपरेशन केले होते. ही दोन्ही गावे महापालिकेतून वगळल्याने राष्ट्रवादीला फटका बसणार असल्याने त्यांना नगरपालिका घोषित करण्यात आले. या निर्णयाचा बाळासाहेंबाची शिवसेना या पक्षाला फायदा होण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर आता अजित पवारांनी मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांना सल्ला दिला आहे. पुढील ५० वर्षांचा विचार न करता असा निर्णय घ्यायला लागले तर पुढची पिढी आपल्याला कधीही माफ करणार नाही असे त यावेळी म्हणाले आहेत.
फुरसुंगी, उरुळी देवाची गावातील गोडाऊनचा टॅक्स वाढतो किंवा कुणाच्या फायद्यासाठी तात्पुरता विचार करून लोकभावना विचारात न घेता कोणाच्यातरी सांगण्यावरून नगरपालिका जाहीर करून टाकल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
हडपसर येथील अमरसृष्टी हौसिंग सोसायटीच्यावतीने उभारलेल्या ४० किलो वॅट क्षमतेच्या सोलर पॉवर जनरेशन प्लांटचे उद्घाटन विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. आमदार चेतन तुपे, हेमलता मगर, सुनील गायकवाड, नीलेश मगर, प्रशांत जगताप, योगेश ससाणे, डॉ. शंतनु जगदाळे, सोसायटीचे चेअरमन स्वप्नील धर्मे यावेळी उपस्थित होते.
पुणे महापालिकेत २०१७ साली ११ गावे आणि त्यांनतर २३ गावांचा समावेश केला गेला. पालिकेच्या गेल्या निवडणुकीत उपनगरांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले आहेत. नगरपालिका घाेषित झालेल्या गावात राष्ट्रवादीचे गणेश ढोरे हे नगरसेवक होते. महापालिकेच्या आगामी प्रभागरचनेत या गावामध्ये नगरसेवकांची संख्या वाढली असती. राष्ट्रवादीचे नगरसेवक जास्त निवडून आले असते. त्याला ब्रेक लावण्यासाठीच भाजप आणि बाळासाहेंबाची शिवसेना यांनी रणनीती तयार करत वरील दोन्ही गावे महापालिकेतून वगळून नगरपालिका करण्याचा निर्णय घेतला आहे.
येत्या काळात विजेचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले असतील. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जेला आपण प्राधान्य दिले पाहिजे. अमरसृष्टी सोसायटीने हा प्रकल्प राबवून चांगला आदर्श दिला आहे. रहिवाशांनीही आपापल्या बंगल्यावर असे संच बसवून विजेची गरज भागविण्याचा प्रयत्न करावा. कचरा, सांडपाणी व्यवस्थापन यासारख्या प्रकल्पांवरही सगळ्याच सोसायट्यांनी लक्ष दिले पाहिजे, असेही पवार यांनी सांगितले.