...तेव्हा तिघांचे रोल वेगळे, आता विकासासाठी एकत्र, मोदींच्या नेतृत्वात करून दाखवू - देवेंद्र फडणवीस
By राजू हिंगे | Published: August 1, 2023 07:04 PM2023-08-01T19:04:17+5:302023-08-01T19:04:59+5:30
मेट्रोचे सर्व मार्ग तयार होतील त्यावेळी पुण्यातील वाहतुकीची समस्या कमी होणार
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात मेट्रोचे भूमिपूजन झाले हाेते. दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटनही त्यांच्याच हस्ते झाले. मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाला मी होतो. त्यावेळी मी विरोधीपक्षनेता, अजित पवार उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असे तिघांचे रोल वेगवेगळे होते. आता मात्र पुण्याच्या स्वप्नांना आणि विकासाला गती देण्यासाठी, आम्ही सगळे एकत्र आलो आहोत. पुणे देशातील उत्तम शहर आहेच; पण मोदींच्या नेतृत्वात ते सर्वोत्तम करून दाखवू, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील विविध विकासकामांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पुण्यातील पाेलिस ग्राउंडवर पार पडले. त्यावेळी फडणवीस बोलत होते. पुणे मेट्रोमुळे अनेकांना फायदा होणार आहे. ज्या दोन मार्गिका आता तयार केल्या आहेत. त्या मार्गिका दोन मार्गांना क्रॉस होणाऱ्या आहेत. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांचा प्रवास सोपा होणार आहे. मेट्रोचे सर्व मार्ग तयार होतील त्यावेळी पुण्यातील वाहतुकीची समस्या कमी होणार आहे, असेही फडणवीस म्हणाले.
मेट्रोसोबतच पीएमपीसाठी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक बस घेतल्या. आज देशातली सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक बसची फ्लिट ही पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये आहे. कोणतंही प्रदूषण न करणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दिली पाहिजे, असं मोदींचं स्वप्न आहे. हिच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वात आधी पुण्यात होत आहे. ही पुण्यासाठी आणि राज्यासाठी चांगली बाब आहे, असेही ते म्हणाले.
पिंपरी-चिंचवडच्या वेस्ट एनर्जीची 2018 साली सुरुवात केली. त्याचा देखील फायदा होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अनेक घरं सुपूर्द केली जाणार आहेत. यातूनच मोदींचं एकही व्यक्ती बेघर राहणार नसल्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. पुणे हे सांस्कृतिक नगरीसोबतच औद्योगिक आणि स्टार्टअप नगरी आहे. पुण्याला स्वप्नपूर्तीची नगरी अशी ओळख निर्माण करुन देऊ, असंही फडणवीस यांनी सांगितले.