...मग सत्ताधारी राज्य कोणासाठी चालवतात : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2024 08:55 AM2024-11-19T08:55:47+5:302024-11-19T09:02:31+5:30

बारामती येथे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराची सांगता सभा

then the rulers run the state for whom : Sharad Pawar | ...मग सत्ताधारी राज्य कोणासाठी चालवतात : शरद पवार

...मग सत्ताधारी राज्य कोणासाठी चालवतात : शरद पवार

बारामती : सत्ताधाऱ्यांनी राज्यात महिला, मुलींसाठी लाडकी बहीण योजना जाहीर केली; पण त्या सुरक्षित नाहीत. आज तरुणांना शिक्षण घेऊनदेखील रोजगार नाही. शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्यांची अवस्था वाईट केली. महिला, युवक, शेतकऱ्यांची ही अवस्था असेल, तर मग सत्ताधारी राज्य कोणासाठी चालवतात, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

बारामती येथे महाविकास आघाडीचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, लाडकी बहीण योजना जाहीर केली. महिला, मुलींचा जरूर सन्मान करा, पण आज राज्यात या बहिणींची काय अवस्था आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्या काळात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. या अत्याचारीत मुली आणि महिलांची संख्या ६७ हजार ३८१ वर पोहोचली आहे. ६४ हजार मुली बेपत्ता आहेत. त्यांच्यासाठी सत्ताधाऱ्यांनी कोणती पावले टाकली, याचे उत्तर द्यावे, असेही पवार म्हणाले.

बारामतीकरांमुळे मुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्या मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्यात अनेक ठिकाणी एमआयडीसी सुरू करून मोठे उद्योग आणले. हजारो हातांना काम दिले. मात्र, आज सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्रात येणारे उद्योग गुजरातला नेले. देशाचा विचार न करणाऱ्या लोकांच्या हातात सत्ता द्यायची का, याचा विचार करा, असा टोला पवार यांनी पंतप्रधानांना लगावला.

यावेळी खासदार सुप्रिया सुळे, डाॅ. अमोल कोल्हे, युगेंद्र पवार, उत्तम जानकर, सक्षणा सलगर यांची भाषणे झाली. यावेळी खासदार धैर्यशील पाटील, प्रतिभा पवार, श्रीनिवास पवार, पृथ्वीराज जाचक, शर्मिला पवार, रेवती सुळे, जगन्नाथ शेवाळे, आदी उपस्थित होते.

फलकाने वेधले लक्ष

बारामती येथील सांगता सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार, रेवती सुळे, शर्मिला पवार यांनी घेतलेल्या फलकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ‘जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय’, अशा आशयाचा तो फलक होता. याशिवाय ‘कराल काय नाद परत’, ‘बापमाणूस’ अशा शरद पवार यांचे वर्णन करणाऱ्या फलकांनी सभेत अनेकांचे लक्ष वेधले.


बारामती ओळख कोणामुळे हे सर्वांना माहीत

काही लोक सांगतात, मी काय करू, ही मोठी गमतीची गोष्ट आहे. १९६७ साली मला बारामतीकरांनी आमदार केलं. त्यानंतर २० वर्षं मी विविध काम केलं. मग अजितदादा पवार आले. त्यांना तीन वेळा उपमुख्यमंत्री, विविध पदे दिली. काम करण्याचे अधिकार दिले. त्यांनीही काम केलं. त्याबाबत माझी तक्रार नसल्याचे शरद पवार म्हणाले. कोठेही जा, देशाच्या कानाकोपऱ्यात बारामतीची ओळख कोणामुळे आहे ते सगळ्यांना माहीत आहे, ती परंपरा चालू ठेवण्यासाठी आता नव्या पिढीकडे सूत्रं सोपवा, असं म्हणत शरद पवारांनी युगेंद्र पवारांना विजयी करण्याचं आवाहन केले.

Web Title: then the rulers run the state for whom : Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.